आमदार विठ्ठल हलगेकर यांची अपेक्षा : वाढदिवसानिमित्त कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन
खानापूर : खानापूर तालुका दुर्गम भागात वसल्याने विविध शासकीय सुविधांचा लाभ मिळावा यासाठी वाढदिवसाचे औचित्य साधून कृषी व शासकीय योजनांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. माझ्या तालुक्यातील शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्य जनतेला शासकीय योजनांची माहिती मिळावी तसेच त्यांचा लाभ मिळावा, एवढाच अट्टहास आहे, असे मत आमदार विठ्ठल हलगेकर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या कृषी प्रदर्शन उद्घाटन सोहळ्यात व्यक्त केले. यावेळी कृषी व शासकीय मेळाव्यांचे उद्घाटन प्रांताधिकारी श्रवणकुमार नाईक, तहसीलदार प्रकाश गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रथम कृषी व शासकीय प्रदर्शनाचे उद्घाटन केल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. फोटोपूजन अॅड. चेतन मणेरीकर व धनश्री सरदेसाई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रास्ताविकात लैला शुगरचे एमडी सदानंद पाटील यांनी महालक्ष्मी ग्रुपच्या वाटचालीचा आढावा घेतला. महालक्ष्मी ग्रुपने शेतकऱ्यांसाठी व सभासदांसाठी कायम तत्पर राहून सेवा दिली आहे. यापुढेही शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे त्यांनी प्रास्ताविकात स्पष्ट करून भावी योजनांची माहिती दिली.
प्रांताधिकारी श्रवणकुमार नाईक म्हणाले की, खानापूर तालुक्यातील खेड्यांतील जनतेला सरकारी योजनांची माहिती मिळावी यासाठी कृषी व शासकीय प्रदर्शन भरविण्यात आले आहे, हे खरोखरच कौतुकास्पद आहे. शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती व्यवसाय न करता आधुनिकतेची कास धरावी. प्रयोगशील शेती तसेच यांत्रिक शेती करून आपले उत्पन्न वाढविण्यासाठी नवनवीन प्रयोग करावेत. कमी शेतीत जास्त उत्पन्न कसे घेता येईल, याचा शेतकऱ्यांनी विचार करणे गरजेचे आहे. त्यानंतर प्रकाश गायकवाड, प्रमोद कोचेरी व धनश्री सरदेसाई यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाला भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, गुंडू तोपिनकट्टी, मल्लाप्पा मारिहाळ, शंकर पाटील, भरमाणी पाटील, महादेव बांदिवडेकर, चांगाप्पा निलजकर, मऱ्याप्पा पाटील, कृषी साहाय्यकचे विजय, किशोर हेब्बाळकर, गोरखनाथ महाराज, सुभाष पाटील, आप्पय्या कोडोळी, तसेच विविध खात्यांचे अधिकारी यांच्यासह विविध संघांच्या महिला, अंगणवाडी खात्याच्या स्वयंसेविका तसेच खानापूर तालुक्यातील शेतकरी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विविध मान्यवरांचा पुरस्काराने गौरव
यावेळी गजानन चव्हाण यांचा दूध उत्पादन,नारायण कार्वेकर यांचा बैलगाडी शर्यतीमध्ये तर परशराम गुरव यांनी ऊस उत्पादनामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच शालेय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मोनेश गावडे, साक्षी बिजापूर, ओमासार समशेर, मेघा पाटील, देवयानी खवरे, अफिया बेळगावी, वैष्णवी हलगेकर या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. मराठी पत्रकार दिनानिमित्त यावेळी पत्रकारांचा सत्कार करण्यात आला.
कृषी-शासकीय प्रदर्शनाला गर्दी
आमदार हलगेकर यांच्या वाढदिवसानिमित्त शांतिनिकेतन क्रीडांगणावर तालुक्यातील विविध सरकारी खात्यांचे स्टॉल उभारण्यात आले होते. यामध्ये प्रामुख्याने कृषी खाते, पशुसंगोपन खाते, समाजकल्याण खाते, हेस्कॉम खाते, महिला व बालकल्याण, फलोद्यान खाते, आरोग्य विभाग तसेच खासगी शेतकऱ्यांची अवजारे, बँका, स्व- साहाय्य संघ यांचे स्टॉल उभारण्यात आले होते. तालुकास्तरीय अधिकारी प्रत्येक स्टॉलवर शेतकऱ्यांना व नागरिकांना आपल्या खात्याची माहिती देऊन लाभ घेण्याचे आवाहन करत होते. तसेच सायंकाळी सर्वच खात्यांच्या जवळपास 34 खात्यांची विविध योजनांच्या डिजिटल माध्यमातून नागरिकांना व शेतकऱ्यांना माहिती दिली. यावेळी तालुकास्तरीय अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रदर्शन पाहण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक व शेतकरी उपस्थित होते.









