मुख्यमंत्री पद नसले तरी एकनाथ शिंदे यांच्या व्यक्तीमत्त्वाची भुरळ कायम
अंबाबाई मंदिरात शिवसैनिकांच्या गराड्यातही भेटीसाठी लोकांची धडपड
कोल्हापूरः धीरज बरगे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हातामध्ये हात देण्यासाठी कोणाची धडपड सुरु होती. तर कोण त्यांचा ऑटोग्राफ घेण्यासाठी प्रवेशद्वाराजवळ बराचकाळ थांबून होते. शिवसैनिकांच्या गराड्यातून एकनाथ शिंदे दिसावेत यासाठी मुलाला खांद्यावर घेवून पालकांचा खटाटोप सुरु होता. तर अनेक तरुण त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी प्रयत्न करत होते, असे काहीसे चित्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्या दरम्यान अंबाबाई मंदिरात होते. हे चित्र पाहून मुख्यमंत्रीपद नसले तरी एकनाथ शिंदे यांच्या व्यक्तीमत्त्वाची भुरळ कायम असून सर्वसामान्यांचा ‘लोकनाथ’ आजही लोकप्रिय असल्याचे दिसून आले.
करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी कोल्हापुरात आले होते. गेल्या अडीच वर्षात मुख्यमंत्रीपद भूषविताना त्यांनी त्यांच्या कार्यपद्धतीमधून जनतेमध्ये वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे. आज त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपद नसले तरी अंबाबाई मंदिरात त्यांच्याभोवती शिवसैनिकांसोबतच असलेल्या सर्वसामान्य नागरिकांचा गराडा त्यांची लोकप्रियता आजही कायम असल्याचे दाखवून देत होता.
अंबाबाई मंदिराच्या दक्षिण दरवाज्यातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंदिरात प्रवेश केला. यावेळी प्रवेशद्वारातून मंदिरात येणाऱ्या शेवटच्या पायरीजवळ एक चिमुकला बराच काळ थांबून होता. येथे उपमुख्यमंत्री शिंदे येताच त्याने वही उघडत त्यांच्याकडे ऑटोग्राफ मागितला.उपमुख्यमंत्री शिंदे यांनी चिमुकल्याच्या हातामधील वही घेत त्यावर स्वाक्षरी केली. यावेळी मंदिर परिसरात अनेक भाविक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाहण्यासाठी थांबून होते. उपमुख्यमंत्री शिंदे करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेवून मंदिरातून बाहेर आल्यानंतर त्यांच्याभोवती शिवसैनिकांचा गराडा होता. शिवसैनिकांकडून पुष्पगुच्छ स्विकारत ते पुढे जात होते. यावेळी मंदिराच्या कठड्यावर कुटुबियांसमवेत उभ्या असलेल्या एका चिमुकल्याची शिंदे यांच्या हातामध्ये हात देण्यासाठी धडपड सुरु होती. त्याची धडपड शिंदेच्या नजरेत आली अन् शिंदेंनी शिवसैनिकांना बाजूला करत त्या चिमुकल्याच्या हातामध्ये हात दिला.
दक्षिण दरवाजातून उपमुख्यमंत्री शिदें बाहेर पडत असताना अनेक मंदिरात दर्शनासाठी आलेल्या बाहेरील तरुणांच्या त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी प्रयत्न सुरु होते. यावेळी काही तरुणांसोबत त्यांनी सेल्फीही घेतले. दक्षिण दरवाजातून बाहेर आल्यानंतर शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. विद्यापीठ हायस्कूलसमोर शिवसैनिकांसह सर्वसामान्य नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या गर्दीतून आपल्या मुलाला उपमुख्यमंत्री शिंदे दिसावेत यासाठी अनेक पालकांनी मुलांना खांद्यावर उचलून घेतले होते. तर उपमुख्यमंत्री शिंदे यांचा फोटो, व्हीडिओ मोबाईलमध्ये घेण्यासाठी अनेक तरुणांचे हात उंचावले होते.
अन् त्या महिलेचे निवेदन स्वीकारले
उपमुख्यमंत्री एकनाथ शिदें यांना पुष्पगुच्छ, विविध निवेदन देण्यासाठी शिवसैनिक, संघटनांचे पदाधिकारी यांची रेटारेटी सुरु होती. या गर्दीमधून मदिर परिसरात एका महिलेचा उपमुख्यमंत्री शिंदे यांना निवेदन देण्यासाठी प्रयत्न सुरु होते. मात्र महिलेला उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यापर्यंत पोहचता येत नव्हते. इतक्या गर्दीमधूनही उपमुख्यमंत्री शिंदे यांना संबंधित महिलेची धडपड दिसुन आली. यावेळी त्यांनी शिवसैनिकांना थांबवत संबंधित महिलेला आपल्यापर्यंत येण्यासाठी वाट करुन देत निवेदन स्विकारले.यामधून उपमुख्यमंत्री शिंदे यांची सर्वसामान्यांच्या नेतृत्त्वाची ओळख अधिक दृढ झाली.
Previous Articleजिह्यात 45 झाले श्रेणी पोलीस उपनिरीक्षक
Next Article कन्व्हेक्शन वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू








