मगच आरोप करावा : कंग्राळी ग्रा. पं.-ग्रामस्थांची मागणी : शहराच्या हद्दीतील कचरा कंग्राळीच्या हद्दीत टाकत असल्यानेच दुर्गंधीची समस्या
वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये विविध ग्रा. पं.चा कचरा फेकला जात आहे. त्याचा ताण महानगरपालिकेवर पडत आहे. यामुळे आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी शहरापासून जवळ असलेल्या काही ग्रा. पं. च्या पीडीओंना बोलावून त्यांना तुमच्या भागातील कचऱ्याची विल्हेवाट तुम्हीच लावा, अशी सक्त ताकीद दिली आहे. यामध्ये कंग्राळी बुद्रुक ग्रा.पं.चाही उल्लेख केला आहे. हे चुकीचे असून उलट शाहूनगर, आझमनगर या महानगरपालिका हद्दीतील वसाहतीतील नागरिकांचा कचरा कंग्राळी बुद्रुक ग्रा. पं. हद्दीमध्ये फेकला जात आहे. यामुळे कचऱ्याचे ढीग निर्माण होऊन कंग्राळी बुद्रुकवासियांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे प्रथम आयुक्तांनी कचरा पडलेल्या जागेची पाहणी करावी, मगच आरोप करावा, असा इशारा ग्रा.पं. सदस्य व ग्रामस्थांतून देण्यात आला आहे. कंग्राळी बुद्रुक गावच्या हाकेच्या अंतरावरच महानगरपालिकेची हद्द सुरू होते. गावच्या दक्षिण दिशेला शाहूनगर, आझमनगर वसाहती आहेत. यामुळे या वसाहतींचे रोजचे सांडपाणी काही कल्पना न देताच कंग्राळी बुद्रुक ग्रा. पं. हद्दीतील सुपीक शेतवडीमध्ये सोडण्यात येते. त्यावेळी शेतकरी वर्ग, नागरिक तसेच अनेक वृत्तपत्रातूनही सदर पाणी सोडू नये यासाठी अर्ज-विनंत्या करण्यात आल्या. परंतु महापालिकेच्या शासकीय अधिकाऱ्याने याकडे लक्षच दिले नाही. ते सध्याही तसेच सुरू आहे. हे सांडपाणी मनपा आयुक्तांना दिसत नाही काय? असेही प्रश्न नागरिक व ग्रा. पं. सदस्यांतून करण्यात येत आहेत.
मनपा हद्दीतील सांडपाणी थेट मार्कंडेय नदीला
कंग्राळी बुद्रुक गावच्या दशिण दिशेकडून शाहूनगर, आझमनगर या मनपा वसाहतींचे पाणी तसेच पूर्वेकडून औद्यौगिक वसाहतींचे सांडपाणी केएलई हॉस्पिटलचेही सांडपाणी आदी सर्वांचे सांडपाणी कंग्राळी बुद्रुक ग्रा. पं. हद्दीतून मार्कंडेय नदीला मिळत आहे. यामुळे नदीचे पाणी दूषित होऊन माणसे व जनावरांना पिण्यास अयोग्य बनले आहे. आपला कचरा आपल्या हद्दीमध्येच टाका, अशी भाषा करणाऱ्या अधिकाऱ्यांनी मनपा हद्दीतील वसाहतींचे सांडपाणी आपल्या हद्दीमध्येच जिरवावे व नदीचे पाणी शुद्ध राहण्यास सहकार्य करण्याची मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे.
..म्हणे रितसर कारवाई करू
कंग्राळी बुद्रुक, शाहूनगर रस्त्याच्या बाजूला मनपा हद्दीतील शाहूनगर वसाहतीमधील नागरिकच कचरा टाकतात, असा आरोप कंग्राळी बुद्रुक ग्रा. पं. ने केला आहे. उलट ग्रा. पं. ने मनपा हद्दीतील नागरिकांवर कारवाई करण्याची गरज आहे. कारण कंग्राळीपासून मनपाची शाहूनगर वसाहत दीड किलोमीटर अतंरावर आहे. आणि येथील नागरिक राजरोसपणे कचरा टाकून कंग्राळी बुद्रुक ग्रा.पं. ची बदनामी करत आहे. हे आयुक्तांनी ध्यानात घ्यावे.
सदर कचरा मनपा हद्दीतील नागरिकांचाच – कौसरजहाँ सय्यद, ग्रा. पं. अध्यक्षा
कंग्राळी बुद्रुक ग्रा.पं. हद्दीतील कचरा जमा करण्यासाठी आम्ही कचरागाडी ठेवली आहे. नागरिक कचरा गाडीतच टाकतात. मनपा शाहूनगर हद्द समाप्तीपासून कंग्राळी बुद्रुक ग्रा.पं. चे प्रवेशद्वार सुरू होते. तेव्हा हा कचरा मनपा हद्दीतील नागरिकांचाच आहे. तेव्हा मनपाने आपल्या हद्दीमध्ये कचराकुंड देऊन कचऱ्याची उचल करावी.
स्वच्छ आंदोलनाचा अवमान- दीपा पम्मार, ग्रा. पं. उपाध्यक्षा
गावच्या प्रवेशद्वाराच्या तोंडावर मनपा हद्दीतीलच नागरिक कचरा टाकून स्वच्छ भारत आंदोलन या घोषवाक्याचा अवमान करत आहेत. मनपा आयुक्तानी कंग्राळी बुद्रुक ग्रा. पं. वर कचऱ्या संदर्भात केलेला आरोप खोटा आहे.
आयुक्तांचा आरोप तथ्यहीन – जयराम पाटील, ग्रा. पं. सदस्य
मनपा आयुक्तानी कंग्राळी बुद्रुक ग्रा. पं. वर कचऱ्यासंदर्भात केलेला आरोप चोराच्या उलट्या बोंबासारखा आहे. गावच्या प्रवेशद्वारावरील रस्त्याच्या बाजूला टाकलेला कचरा शाहूनगर मनपा हद्दीतील नागरिकांचाच आहे. आझमनगर व शाहूनगर हद्दीतील नागरिकांचे रोजचे सांडपाणी कंग्राळी बुद्रुक ग्रा.पं. हद्दीमध्ये येते. हे कंग्राळी बुद्रुक नागरिक सहन करत आहेत. आयुक्तांनी प्रथम हद्दीची पाहणी करावी, मगच कारवाईची भाषा बोलावी.
महापालिकेच्या हद्दीतील कचरा – कल्लाप्पा अष्टेकर, ग्रा. पं. सदस्य
महानगरपालिका हद्दीतील कचरा व सांडपाणी कंग्राळी बुद्रुक ग्रा.पं. हद्दीमध्ये टाकणे व दुर्गंधी पसरवणे ही नित्याचेच झाले आहे. शाहूनगर मनपा हद्दीमध्ये कचरा कुंड नसल्यामुळे या भागातील नागरिक कंग्राळी बुद्रुक हद्दीमध्ये कचरा टाकून वातावरण दुर्गंधीयुक्त करत आहेत.
आयुक्तांनी प्रथम शहानिशा करावी- बंदेनवाज सय्यद, ग्रा.पं. सदस्य
कंग्राळी बुद्रुक ग्रा.पं. च्या वतीने कचरा टाकल्यास 500 रूपये दंड असा फलक लावून देखील मनपा हद्दीतील नागरिक त्या फलकाच्या शेजारीच कचरा टाकत आहेत. आयुक्तानी प्रथम कचरा कुणाच्या हद्दीमध्ये पडला आहे. याची शहानिशा करावी, मगच कारवाईची भाषा बोलावी.









