वृत्तसंस्था/ फुकेत (थायलंड)
भारताची महिला वेटलिफ्टर मीराबाई चानूचे दुखापतीच्या समस्येमुळे तब्बल 6 महिन्यांच्या विश्रांतीनंतर स्पर्धात्मक क्षेत्रात पुनरागमन होत आहे. येत्या जुलै-ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत आपली पात्रता सिद्ध करण्यासाठी मीराबाई पुन्हा सज्ज झाली आहे.
फुकेत येथे सोमवारपासून आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग फेडरेशनच्या विश्वचषक वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू सहभागी होत आहे. ही विश्वचषक वेटलिफ्टिंग स्पर्धा पॅरिस ऑलिम्पिकसाठी अंतिम पात्रतेची नाही. पण पॅरिस ऑलिम्पिकसाठी ती स्पर्धकांना आपली पात्रता सिद्ध करण्याची संधी उपलब्ध करुन देणार आहे. गेल्या वर्षीच्या सप्टेंबरमध्ये झालेल्या आशियाइ क्रीडा स्पर्धेत मीराबाई चानूला स्नायू दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे तिला तब्बल 6 महिने वेटलिफ्टिंग क्षेत्रापासून अलिप्त रहावे लागले होते. मीराबाईची ही दुखापत आता पूर्णपणे बरी झाली आसल्याने तिने थायलंडमधील या स्पर्धेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. थायलंडमधील या स्पर्धेत केवळ आपला सहभाग मीराबाई चानूला पॅरिस ऑलिम्पिकसाठी पुरेसा आहे. महिलांच्या 49 किलो वजन गटात मीराबाई चानू ही यापूर्वी विश्व चॅम्पियन म्हणून ओळखली गेली. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत मीराबाई चानूने रौप्यपदक मिळविले होते.









