वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्र सरकारने नव्या वंदे भारत रेल्वे गाड्यांचा रंग भगवा आणि करडा (ग्रे) करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या काही गाड्या या रंगाच्या आहेत. पण आता सर्वच नव्या गाड्यांचा रंग असा करण्यात येणार आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही घोषणा रविवारी केली आहे. लवकरच हे रंगकाम होणार आहे.
सध्या अनेक वंदे भारत गाड्या प्रामुख्याने पांढऱ्या रंगाच्या आहेत. तथापि, भगवा आणि करडा रंग अधिक आकर्षक आहे. तसेच भगव्या रंगाची प्रेरणा राष्ट्रध्वजावरील भगव्या रंगापासून घेण्यात आली आहे, असेही प्रतिपादन त्यांनी केले. या गाड्यांच्या इंजिनाच्या दर्शनी भागाचा रंग भगवा असेल. तर मागचा भाग करड्या रंगाचा असेल. गाड्यांवरचे ‘भारतीय रेल्वे’ हे बोधचिन्ह पांढऱ्या रंगाचे असेल तर निळा रंगही उपयोगात आणला जाणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. वंदे भारत श्रेणीतील 28 व्या गाडीचे उद्घाटन काही दिवसांपूर्वी करण्यात आले. या गाडीचा बाहेरचा रंग नव्या प्रकारे देण्यात आला आहे.
वंदे भारत काय आहे ?
वंदे भारत ही संपूर्णपणे भारत निर्मित अशी रेल्वे गाडी असून ती जलद-मध्य गतीची आहे. तिचा सरासरी वेग 225 किलोमीटर प्रतितास आहे. तिचा आतील भाग आधुनिक आणि अधिक सुखावह असा आहे. पर्यटन किंवा कोणत्याही लांबच्या प्रवासासाठी ही गाडी लाभदायक आहे, असा प्रवाशांचा अनुभव आहे.









