प्रत्येक गावाचे एक वैशिष्ट्या असते, ही बाब आपल्याला परिचित आहे. या वैशिष्ट्यांचे काही ऐतिहासिक किंवा सांस्कृतिक कारणही असू शकते. किंवा त्या गावातील लोकांनी हेतुपुरस्सर ठरवून काही बाबी निर्माण केलेल्या असतात. कालांतराने या वैशिष्ट्यांची परंपरा बनते आणि अशा गावांना ख्याती प्राप्त करुन देते. ब्रिटनमधील रोदरहॅभ भागात वेंटवर्थ नामक एक गाव असेच आहे.
या गावात गेल्यानंतर प्रत्येकाला आपण 18 व्या शतकात वावरत आहोत, असा भास झाल्याशिवाय रहात नाही. कारण या गावातील वातावरण तसेच आहे. हे गाव अतिशय सुंदर आणि स्वच्छ आहे. या गावातील सर्व वास्तू या सतराव्या किंवा आठराव्या शतकातील आहेत. नवी वास्तू उभी करण्यास येथे अनुमतीही मिळत नाही. या गावाचे व्यवस्थापन फिट्झविलियम एनिमिटी न्यासाकडून केले जाते. या गावाचे हे ऐतिहासिक स्वरुप त्याच स्थितीत राखण्यासाठी या न्यासाने काही नियम केले आहेत. हे नियम गावात वास्तव्यास असणाऱ्या प्रत्येकाला पाळावे लागतात.
या गावात साधारणत: 1 हजार 400 लोक राहतात. ते सर्वजण कोणतेही निमित्त न शोधता या नियमांचे पालन कसोशीने आणि सातत्याने करतात. एक नियम असा आहे की जो या गावाचे वैशिष्ट्या बनला आहे. तो असा आहे, की या गावातल्या प्रत्येक वास्तूच्या दरवाजांचा रंग ‘वेंटवर्थ ग्रीन’ हाच असला पाहिजे. दुसरा नियम असा की प्रत्येक वास्तूच्या खिडक्यांच्या चौकटींचा रंग पांढरट (ऑफ व्हाईट) असला पाहिजे. या रंगांची छटाही ठरलेली आहे. यामुळे मुळात सुंदर असलेले हे गाव अधिकच खुलून दिसते, असे ते पाहिलेल्या पर्यटकांचे म्हणणे आहे. हे गाव पाहण्यासाठी दरवर्षी असंख्य पर्यटक येथे येत असतात.
या गावात अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत. दोन जुनी चर्चेस आहेत. ब्रिटनमधील सर्वात मोठ्या मानल्या गेलेल्या ‘जॉर्जियन’ पद्धतीच्या घरांपैकी एक या गावात आहे. अशा अनेक ऐतिहासिक वैशिष्ट्यांनी भरलेले हे गाव असले तरी दरवाजांचा समान रंग हे त्याचे आगळेवेगळे विशेष वैशिष्ट्या मानले गेले आहे.









