पहाटे-रात्री हुडहुडी : दिवसभर ढगाळ वातावरण
प्रतिनिधी/ बेळगाव
मागील चार दिवसांपासून पुन्हा थंडीचा कडाका हळूहळू वाढू लागला आहे. त्यामुळे पहाटे व रात्री हुडहुडी अनुभवयास मिळत आहे. मागील आठवड्यात ढगाळ वातावरण आणि पावसाने हजेरी लावली होती. दरम्यान, थंडी ओसरली होती. आता पुन्हा थंडीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे उबदार कपड्यांना अधिक पसंती दिली जात आहे.
यंदा सातत्याने हवामानात बदल होऊ लागला आहे. नोव्हेंबर अखेरपर्यंत परतीचा पाऊस झाला होता. त्यानंतर सातत्याने ढगाळ वातावरण आणि पावसाचा शिडकावा झाला आहे. काही ठिकाणी कमी जास्त प्रमाणात पावसाने हजेरी लावली आहे. सद्यस्थितीत ढगाळ वातावरणही कायम आहे. त्याबरोबर पहाटे व रात्री बोचरी थंडी अनुभवयास मिळत आहे. थंडीपासून संरक्षण करण्यासाठी उबदार कपड्यांबरोबर ग्रामीण भागात शेकोट्याही पेटू लागल्या आहेत.
बदलत्या हवामानामुळे मानवी जीवनावर परिणाम
बदलत्या हवामानामुळे मानवी जीवनावर परिणाम होऊ लागला आहे. कधी थंडी, कधी गरमी तर कधी ढगाळ वातावरण तर कधी अचानक पाऊस अशा बदलत्या वातावरणामुळे आरोग्याच्या समस्याही निर्माण होऊ लागल्या आहेत. मागील आठवड्यात कमी झालेली थंडी आता पुन्हा वाढू लागली आहे.









