कोल्हापूर :
पावसाळ्याची चाहूल लागलेली असतानाही रामानंदनगर ओढ्याची सफाई अद्याप झालेली नाही. ओढ्यात थेट सांडपाणी मिसळत असून प्लास्टिक पिशव्या, बाटल्या, कुजलेले नारळ, झाडांच्या फांद्या व इतर कच्रयामुळे प्रचंड दुर्गंधी निर्माण झाली आहे. त्यामुळे ओढ्याच्या काठच्या रहिवाशांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
रायगड कॉलनीपासून रामानंदनगर म्हाडा कॉलनी, आयसोलेशन हॉस्पिटल मार्गे रेणुका मंदिरापर्यंत हा ओढा वाहतो. या ओढ्याच्या दुतर्फा अनेक घरे असून पावसाळ्यात पुराचे पाणी घरात शिरू नये म्हणून महापालिकेने रायगड कॉलनी पूल ते शाहू कॉलनीदरम्यान ओढ्याच्या दोन्ही बाजूंना संरक्षक भिंती बांधल्या आहेत. मात्र काही वेळा पुराचे पाणी या भिंतींवरून ओघळून घरांमध्ये शिरते.
वेळेवर ओढ्याची सफाई करण्याची मागणी वारंवार केली होती. मात्र मे महिन्याचा तिसरा आठवडा संपत आला तरीही महापालिकेकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. रामानंदनगर पुलाच्या परिसरात ओढ्यात मोठ्या प्रमाणावर कचरा साचलेला असून, तो न काढल्यास पावसात ओढा तुंबण्याची व पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
महापालिकेने वेळीच लक्ष देऊन ओढ्यातील साचलेला कचरा काढावा, अन्यथा होणाऱ्या नुकसानीस प्रशासन जबाबदार राहील, अशी तीव्र भावना स्थानिकांनी व्यक्त केली आहे.
घरात पाणी शिरले की कोणीही जबाबदारी घेत नाही दरवर्षी हेच चित्र असतं. प्रशासन वेळेत साफसफाई करत नाही, आणि पावसात आम्हाला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. घरात पाणी शिरले की मग कोणीही जबाबदारी घेत नाही.
संदिप कदम, नागरिक रामानंद नगर कोल्हापूर








