कोल्हापूर / आशिष आडिवरेकर :
शहरामध्ये सध्या घरफोडी, चेन स्नॅचिंग सह पोलीस असल्याची बतावणी करुन दागिने लंपास करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या घटना रोखण्यात तसेच गुह्यांची उकल करण्यात स्थानिक पोलीस ठाण्यांचे डीबी (गुन्हे प्रकटीकरण) पथक इनअॅक्टीव्ह असल्याचे दिसत आहे. लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यामध्ये डीबी पथक फक्त कागदावरच असून, शाहूपुरी आणि जुना राजवाडा पोलीस ठाण्यातील डीबी पथकांना इनचार्जच नसल्याचे दिसून येत आहे. येत्या आठ दिवसांमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या होण्याची शक्यता आहे. यामुळे पोलीस स्टेशनमधील डीबी पथकांच पुर्नरचना करण्याची गरज निर्माण झाली आहे.
शहरात सध्या चेन स्नॅचिंग, घरफोड्या आणि दुचाकी चोरींचे प्रमाण वाढले आहे. याचसोबत मोबाईल चोरीसह पोलीस असल्याची बतावणी करुन दागिने चोरण्यांचे प्रमाणही वाढत आहे. या घटनांवर पायबंद घालण्यासाठी शहरातील डीबी पथके अॅक्टीव्ह असणे गरजेचे आहे. मात्र सध्या ही पथके केवळ कलेक्शनवरच भर देत असल्याचे दिसत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांना अंधारात ठेवून हम करे सो कायदा या प्रमाणे या पथकांचे काम सुरु आहे. ना अंगावर खाकी वर्दी, ना तपासाची जबाबदारी यामुळे दिवसभरात कधीही पोलीस स्टेशनला येवून हजेरी लावण्याचे काम या पथकातील कर्मचाऱ्यांकडून सुरु आहे. यामुळे आता पोलीस स्टेशनच्या निरीक्षकांना डीबी पथकांच्या कामकाजाचा आढावा घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
- लक्ष्मीपुरीत डीबी पथकच नाही
शहराच्या मध्यवर्ती वस्तीमध्ये असणारे आणि संवेदनशील असणाऱ्या लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यास सध्या डीबी पथकाच नसल्याचे दिसून येत आहे.ना डीबी पथक ना डीबी इनचार्ज अशी अवस्था या पोलीस स्टेशनची झाली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्जाच्या काही अधिकाऱ्यांकडे या पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाच्या इनजार्चची जबाबदारी देणे आवश्यक आहे. तीन महिन्यापूर्वी पोलीस स्टेशनकडून एक मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यात आला आहे.
- राजवाड्याच्या डीबीला अधिकारीच नाही
जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाला इनजार्चच नाही आहे. पोलीस उपनिरीक्षक गळवे यांची स्थानिक गुन्हे अन्वेषण येथे बदली झाल्यानंतर दोन महिन्यापासून डीबी पथकाचे इनजार्चपद रिक्त आहे. यामुळे जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पथक सध्या निवांत आहे. एक महिन्यापूर्वी सानेगुरुजी येथे घडलेल्या घरफोडीचा तपासातही अद्याप काहीच प्रगती नसल्याचे दिसून येत आहे. याचसोबत दोन महिन्यापूर्वी मोटारसायकल चोरीच्या तपासानंतर या पथकाकडून कोणत्याची गुह्यांचे प्रकटीकरण झालेले दिसत नाही.
- शाहूपुरी, राजारामपुरीत माहितगार अधिकारी आवश्यक
शहरातील व्यापारपेठ आणि प्रशासकीय दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या शाहूपुरी आणि राजारामपुरी पोलीस ठाण्यांचे डीबी पथक काही प्रमाणात अॅक्टीव्ह आहेत. राजारामपुरीमध्ये विशाल आणि सलीम हे दोघेच डीबी पथक चालवत आहेत. डीबी पथकांचे इनचार्ज नवीन असून, त्यांचा वेळ पोलीस स्टेशनची हद्द समजून घेण्यातच जात आहे. शाहूपुरी पोलीस ठाण्यामध्येही अशीच परिस्थती आहे. या दोनही पोलीस स्टेशनचे निरीक्षक स्वत: फिल्डवर उतरुन डिटेक्शनसाठी प्रयत्न करत आहेत. मात्र डीबी पथकातील कर्मचारी निवांतच आहेत. दिवसभर तपासाच्या नावाखाली बाहेर फिरुन रात्री पोलीस स्टेशनला इंट्री देण्यापुरतेच येत आहेत.
- इलेक्शनची तयारी
पुर्वी शहरातील डीबी पथकांचा एक दरारा होता. हद्दीमधील प्रत्येक गुन्हेगाराची खडा न खडा माहिती या पथकातील कर्मचाऱ्यांना होती. मात्र आता हद्दपार गुंडही सर्रासपणे हद्दीमध्ये फिरत आहेत. तरीही डीबी पथके यापासून अनभिज्ञ असल्याचे दिसत आहेत. किंवा काही पोलीस कर्मचारी सोईस्करपणे याकडे दुर्लक्ष करत आहेत. आता महापालिकेच्या निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत राज्य शासनाचे कान टोचल्यामुळे या निवडणुकांची लगबग आता सुरु झाली आहे. यामुळे शहरातील डीबी पथके सक्षम आणि अॅक्टीव्ह असणे आवश्यक आहे.
- शहर पोलीस उपअधिक्षकांचे पथकच सुस्त
शहरातील चारही पोलीस ठाण्यांच्या कारभारावर देखरेख ठेवण्यासाठी शहर पोलीस उपअधिक्षक आणि त्यांचे पथक कार्यरत आहे. मुळात हेच पथक सध्या सुस्त झाले असल्याचे दिसून येत आहे. मोक्यामध्ये पसार असणारा सम्राट कोराणे पोलिसांच्या डोळ्यादेखत न्यायालयात हजर होतो मात्र शहर पोलीस उपअधिक्षकांच्या पथकाला साधी याची कुणकुण देखील लागत नाही. 2024 मध्ये या पथकाने एक पिस्तुल शोधण्याचे काम केले, मात्र यानंतर या पथकाकडून काहीही तपास झालेला दिसत नाही. मोठ्या घरफोड्यांच्या ठिकाणी भेटी देण्यातच धन्यता मानली जात आहे.
- डीबी पथकांसमोरील आव्हाने
– महापालीका निवडणूकीमध्ये उपद्रवी घटकांच्या कारवायांना पायबंद घालणे
– मोबाईल, चेन स्नॅचिंग रोखणे, दुचाकी चोऱ्यांवर पायबंद घालणे
– घरफोड्या थांबवणे,
– छुप्या पद्धतीने अवैद्य व्यवसाय सुऊ असल्यास त्यांचा बिमोड करणे
– गुन्हे प्रकटीकरणावर भर देणे








