पाण्याचा अपव्यय, नागरिक संतप्त : एलअॅण्डटी कंपनी दुरुस्ती करण्याबाबत उदासीन
बेळगाव : शहरात पाणी समस्या गंभीर बनू लागली आहे. तर दुसरीकडे जलवाहिन्यांना गळती लागून हजारो लिटर पाणी वाया जाऊ लागले आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत. शहरात विविध ठिकाणी जलवाहिन्यांना गळतीचे ग्रहणच लागले आहे. दोन दिवसांपूर्वी खणगावनजीक हिडकलच्या मुख्य जलवाहिनीला गळती लागून मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय झाला होता. दरम्यान दोन दिवस शहरातील पाणीपुरवठादेखील ठप्प झाला होता. शहरात विविध ठिकाणी जलवाहिन्यांना गळती लागण्याचे प्रमाण वाढले आहे. वाढत्या उष्म्याने शरीराची लाहीलाही होऊ लागली आहे. काही ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. अशा परिस्थितीत जलवाहिन्यांना गळती लागून पाणी वाया जात असल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. याबाबत एलअॅण्डटी कंपनी उदासीन असल्याचे दिसत आहे. शहराला राकसकोप आणि हिडकल जलाशयातून पाण्याचा पुरवठा केला जातो. यंदा राकसकोप आणि हिडकल जलाशयात पाणी पातळीत मोठी घट झाली आहे. मे अखेर पुरेल इतकेच पाणी राकसकोपमध्ये आहे. मात्र दुसरीकडे जलवाहिन्यांना गळती लागत असल्याने चिंता व्यक्त होऊ लागली आहे. जलवाहिन्या फुटणे, व्हॉल्वला गळती अशा प्रकारांमुळे पाण्याचा अपव्यय होऊ लागला आहे. विकासकामांसाठी जागोजागी खोदाई सुरू झाली आहे. दरम्यान जलवाहिन्या फुटून हजारो लिटर पाणी वाया जाताना दिसत आहे. शहरात दररोज कोठे ना कोठे पाण्याचा अपव्यय होऊ लागला आहे. तर दुसरीकडे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. जलवाहिन्यांची दुरुस्ती तातडीने करण्यात एलअॅण्डटीला अपयश येत आहे. जलवाहिन्यांच्या गळती तातडीने थांबवून सुरळीत पाणीपुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांतून होऊ लागली आहे.









