आपल्या देशात अनेक शहरे असून, प्रत्येकाचे स्वत:चे असे एक वैशिष्ट्या आहे. या वैशिष्ट्यामुळे या शहरांची ख्याती निर्माण झालेली असते. तेलंगणा या राज्यातील नलगोंडा हे शहर त्याच्या वेगळ्याच वैशिष्ट्यासाठी प्रसिद्ध आहे. हे शहर प्रतिदिन 52 सेकंदांसाठी स्तब्ध उभे रहात असते. शहरातील जवळपास प्रत्येक नागरीक हा नियम पाळतो. असे दुसऱ्या कोणत्याही शहरात घडत नाही.
या शहरात प्रतिदिन सकाळी भारताचे राष्ट्रगीत वाजवले जाते. त्याचा प्रारंभ झाला की, शहरातील प्रत्येक नागरीक स्तब्ध उभा राहतो. तो कोणतेही काम करीत असला तरी राष्ट्रगीताची धून कानावर आली की तो हातातील काम सोडून राष्ट्रगीत संपेपर्यंत उभा राहतो. जणू हा या शहरातील अलिखित नियमच झाला आहे. वास्तविक या नियमाची सक्ती नाही. पण शहरातील बहुतेक सर्व नागरीक या नियमाचे स्वत:हून पालन करतात. हेच या शहराचे वैशिष्ट्या आहे.
या शहराच्या 12 भागांमध्ये ध्वनिवर्धकावर एकाचवेळी सकाळी राष्ट्रगीत वाजविले जाते. आपले राष्ट्रगीत 52 सेकंदांचे आहे. ते वाजण्यास आरंभ झाला की या शहरातील नागरीक त्याला मान देण्यासाठी उभे राहतात. ही प्रथा गेल्या कित्येक दशकांपासून असून लहान मुलांसह प्रत्येक जण ती निष्ठेने पाळतो.









