आज शुभमुहूर्तावर खरेदीला उधाण ः भाऊबीजसाठी चैतन्याचे वातावरण
बेळगाव / प्रतिनिधी
अंधाराकडून प्रकाशाकडे नेणाऱया दिवाळी सणाला शुक्रवारपासून उत्साहात प्रारंभ झाला. आज बुधवारी पाडवा आणि भाऊबीज असल्याने नागरिकांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर नवीन वस्तू खरेदीला पसंती दिली जाते. त्यामुळे बुधवारी शोरूममध्ये खरेदीसाठी वर्दळ वाढेल, अशी आशा आहे.
वसुबारसपासून दिवाळीला सुरुवात झाली आहे. त्यानंतर धनत्रयोदशी आणि सोमवारी नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनाची धामधूम झाली. मात्र, मंगळवारी खंडग्रास सूर्यग्रहणामुळे बाजारपेठ ओस पडली. बुधवारी होणाऱया पाडव्यासाठी सारे शहर सज्ज झाले आहे. त्याचबरोबर भाऊबीजही असल्याने भेटवस्तू आणि इतर वस्तू खरेदीला वेग येणार आहे. घरोघरी भाऊबीजेचा कार्यक्रम होणार आहे. विशेषतः पाडव्याच्या शुभमुहूर्तावर इलेक्ट्रॉनिक वस्तू, नवीन दुचाकी, सोने खरेदीसाठी सराफ दुकानांत गर्दी होणार आहे.
कोरोनामुळे मागील दोन वर्षांत सण-उत्सवांवर मर्यादा आल्या होत्या. मात्र, आता सण व उत्सव मोठय़ा उत्साहात साजरे होत आहेत. यंदाची दिवाळी उत्साहात साजरी केली जात आहे. बुधवारी होणारा पाडवा आणि भाऊबीजसाठी नागरिकांमध्ये चैतन्याचे वातावरण आहे.









