शरीराची होतेय लाही लाही, शीतपेयांना मागणी
बेळगाव : मागील काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला आहे. त्यामुळे नागरिकांच्या शरीराची लाही लाही होऊ लागली आहे. दुपारच्या उन्हाच्या झळा वाढू लागल्याने पारा 36 अंशांपर्यंत गेला आहे. त्यामुळे वाढत्या उन्हाचा चटका नागरिकांना सहन करावा लागत आहे. दरम्यान पंखा, एसी, कुलरचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. शिवाय शीतपेयांना अधिक पसंती दिली जात आहे. वाढत्या उन्हामुळे दुपारी काही नागरिक छत्रीचा आधार घेऊ लागले आहेत. शिवाय रस्त्यावरून फिरणाऱ्यांची पावले शीतपेयांकडे वळू लागली आहेत. त्यामुळे शहाळे, आईस्क्रीम, लिंबू सरबत, कलिंगडे आदींना मागणी वाढू लागली आहे. त्यामुळे कोल्ड्रींक्स हाऊसदेखील फूल होताना दिसून येत आहेत. मार्च महिन्यात पारा 36 अंशांपर्यंत गेल्याने एप्रिल-मे महिन्यात उष्म्यात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. सकाळी आणि सायंकाळच्या वेळेत काही प्रमाणात थंडी असली तरी दुपारच्या वेळेत उन्हाचा तडाखा अधिक जाणवू लागला आहे. उन्हाच्या झळांमुळे शहरातील काही भागात पाणपोईची व्यवस्था करण्यात आली आहे. मारुती गल्ली, गणपत गल्ली, कडोलकर गल्ली, पांगुळ गल्ली, समादेवी गल्ली, रामलिंग खिंड गल्ली, रामदेव गल्ली, नरगुंदकर भावे चौक आदी ठिकाणी पाणपोई उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे बाजारात येणाऱ्या नागरिकांना पाण्याची व्यवस्था होऊ लागली आहे. वाढत्या उष्म्यामुळे अननस, मोसंबी, टरबूज, कोकम सरबत, कलिंगड यासारख्या थंडावा देणाऱ्या शीतपेयांना मागणी वाढत आहे. विशेषत: शहरात कलिंगडची आवक वाढली आहे. त्याचबरोबर गाजर, काकडी आदींची खरेदीही होऊ लागली आहे. त्याचबरोबर गरिबांचा फ्रिज म्हणून ओळखला जाणाऱ्या माठांना मागणी वाढू लागली आहे. वाढत्या उष्म्याचा परिणाम मानवी जीवनावर होताना दिसत आहे.









