लॉकअप डेथप्रकरणी चौकशी : ‘ग्रामीण’ची भंबेरी

प्रतिनिधी /बेळगाव
खळबळजनक लॉकअप डेथप्रकरणाच्या चौकशीसाठी रविवारी सीआयडीचे अधिकारी बेळगावात दाखल झाले आहेत. बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकाला भेट देऊन त्यांनी अधिकारी व पोलिसांकडून एकंदर घटनेसंबंधी माहिती घेतली. सोमवारी या पथकातील अधिकारी सिव्हिल हॉस्पिटलला भेट देण्याची शक्मयता आहे.
गांजाप्रकरणी चौकशीसाठी येथील बेळगाव ग्रामीण पोलिसांनी अटक केलेल्या बेल्लद बागेवाडी, ता. हुक्केरी येथील बसनगौडा पाटील (वय 45) याचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. शुक्रवार दि. 11 नोव्हेंबर रोजी ही घटना घडली असून शनिवारी बसनगौडाच्या मृतदेहावर उत्तरीय तपासणी करून तो बेल्लद बागेवाडीला पाठविण्यात आला होता. रविवारी सीआयडीचे अधिकारी बेळगावात दाखल झाले आहेत. बेंगळूर येथील एक डीएसपी व बेळगाव येथील सीआयडीच्या स्थानिक अधिकाऱयांनी रविवारी सायंकाळी 4 वाजता बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानक गाठले. केए 04, जी 930 क्रमांकाच्या बोलेरो वाहनातून हे अधिकारी आले होते.
बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकातील अधिकारी व पोलिसांकडून शुक्रवारी घडलेल्या लॉकअप डेथप्रकरणी या अधिकाऱयांनी माहिती जमा केली असून पोलीस स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेरे सुस्थितीत आहेत की नाही? यासंबंधीही चौकशी केली आहे. सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतल्यानंतर या घटनेसंबंधी बरीच माहिती बाहेर पडणार आहे.
उपलब्ध माहितीनुसार सोमवारी सीआयडीचे अधिकारी सिव्हिल हॉस्पिटलला भेट देऊन बसनगौडाला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कधी दाखल करण्यात आले, त्याचा मृत्यू कशामुळे झाला, त्याच्यावर उपचार करणारे डॉक्टर कोण? आदींविषयी माहिती जमवणार आहेत. सिव्हिल हॉस्पिटलमधील सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी करण्यात येणार आहे.
बेळगाव ग्रामीण पोलिसांनी मात्र एकंदर प्रकरणासंबंधी गुप्तता पाळली आहे. प्रकरण अंगलट येऊ नये, यासाठी खबरदारी घेण्यात येत असून बसनगौडाला कोणत्या प्रकरणात अटक झाली, त्याच्याजवळून किती गांजा जप्त करण्यात आला? आदींविषयीही माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळेच बसनगौडाची मुलगी रोहिणी हिने आपल्या वडिलांना पोलिसांनी खोटय़ा गुन्हय़ात अडकविल्याचा आरोप केला आहे.
पोलीस अधिकाऱयांची धावपळ व लपवाछपवी लक्षात घेता लॉकअप डेथप्रकरणाचे गूढ आणखी गडद होत चालले आहे. अधिकाऱयांचा काहीच संबंध नाही? तर अशी लपवाछपवी का केली जात आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पोलीस अधिकाऱयांनी बसनगौडाच्या कुटुंबीयांचीही दिशाभूल केल्याचा आरोप होत आहे.
सायंकाळी 4 ते 6.15 पर्यंत सीआयडीचे अधिकारी बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात होते. या दरम्यान 5.30 वाजण्याच्या सुमारास ग्रामीणचे एसीपी गिरीश यांचे पोलीस स्थानकात आगमन झाले. पहिल्या मजल्यावरील कार्यालयात अधिकाऱयांनी माहिती गोळा केली. त्यानंतर 6.15 वाजण्याच्या सुमारास या पथकातील अधिकारी तेथून बाहेर पडले.
आपल्या वडिलांचे हात दोरीने बांधण्यात आले होते. पोलिसांच्या छळामुळे त्याचा लॉकअप डेथ झाला आहे, असा गंभीर आरोप बसनगौडा यांच्या मुलीने शनिवारी केला होता. याला उत्तर देण्याचे कामही पोलिसांनी केले नाही. घटना घडली त्या दिवशी पुसटशी माहिती वरि÷ पोलीस अधिकाऱयांकडून देण्यात आली होती. त्यानंतर कसलीच अधिकृत माहिती दिली गेली नाही. त्यामुळे या प्रकरणातील गूढ आणखी वाढत चालले आहे.
खोटय़ा गुन्हय़ांचीही चौकशी होणार का?
बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात गेल्या सहा महिन्यांत अनेक जणांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणांचीही चौकशी झाली तर अधिकारी चांगलेच अडचणीत येणार आहेत. पोलीस निरीक्षक श्रीनिवास हंडा बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात रुजू झाल्यानंतर या पोलीस स्थानकातील कारभाराविषयी संशयास्पद वातावरण निर्माण झाले आहे. निरपराध्यांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना छळल्याचे अनेक प्रकार घडले आहेत. आता लॉकअप डेथप्रकरणामुळे जुन्या खोटय़ा प्रकरणांनाही उजाळा मिळाला आहे.









