तासगाव :
तासगाव तालुक्यात झाडावर सुगरण पक्ष्यांचा किलबिलाट वाढलेला पाहवयास मिळत आहे. विहिरी, तलाव, ओढा तसेच शेतामधील झाडावर सुगरण पक्ष्यांचा होणारा किलबिलाट निसर्गप्रेमींना हवाहवासा आहे. त्यामुळे, अरे खोप्यामध्ये खोपा, सुगरणीचा चांगला देखा पिलासाठी तिन झोका झाडाले टांगला. या बहिणाबाई चौधरींच्या काव्य पंक्तीची आठवण येते.
सुगरण पक्षी पाण्याच्या कडेला, कडूनिंबाचे किंवा बाभळीच्या झांडाच्या फांद्यांच्या टोकावर घरटी बांधण्यासाठी गर्दी करू लागले आहेत. शत्रुपक्षांचा घरटी, त्यांनी घातलेली अंडी किंवा पिल्लांना कोणता उपद्रव होऊ नये यासाठी वनस्पतींच्या अगदी टोकावर घरटी बांधण्याचे कौशल्य सुगरण पक्ष्यांना आहे. सध्या मिलनाचा काळ असल्याने नर पक्षी मादी सुगरणीला आकर्षित करण्यासाठी घरट्यांची कलात्मक निर्मिती करीत आहेत. गवताच्या विशिष्ट पाल्यापासून गवत विणुन आपल्या कौशल्याने घरट्यांची निर्मिति नर पक्षी करतात. याकामी मादीही नराला मदत करते.
घरटे पूर्ण झाल्यावर नर मादी येथे एकत्र राहतात. मादी अंडी घालुन पिलांना जन्म दिल्यानंतर काही दिवसांनी दुरवर निघुन जातात. अशा या सुगरण पक्षांची सध्या ग्रामीण भागात लगबग वाढली आहे.








