चिपळूण / राजेश जाधव :
शहरातून जाणाऱ्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाला अतिक्रमणाचा विळखा बसत आहे. पॉवरहाऊस ते कापसाळपर्यंत झालेले अतिक्रमण अपघातांचे एक कारणही ठरत आहे. गटारांवर थाटलेल्या दुकानांमध्ये खरेदी करताना वाहने अर्ध्या रस्त्यावर उभी केली जात आहेत. तर खासगी बसेस, कार यांचे महामार्गावरील नियमित पार्किंगही अडचणीचे ठरत आहे. असे असताना राष्ट्रीय महामार्ग विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. ते काही केल्या पूर्ण होताना दिसत नाही. यामुळे नागरिक, वाहन चालक यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत असतानाच आता पॉवरहाऊस ते कापसाळ दरम्यान होणाऱ्या अपघातांनी सर्वांची चिंता गंभीर स्वरुपात होणाऱ्या वाढवली आहे. मात्र अपघातांची कारणे कोणीही शोघत नसून केवळ उड्डाणपूल कापसाळपर्यंत व्हावा इतकीच मागणी होत आहे.
असे असले तरी शहर आणि परिसराचा विचार करता बहादूरशेखनाका ते कापसाळ दरम्यान महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी गटारांवर झालेले अतिक्रमण, पॉवरहाऊस परिसरात दररोज दोन्ही बाजूंनी होणारे खासगी बसेस, कार व अन्य वाहनांचे पार्किंग याकडे कानाडोळा केला जात आहे. अपघातांसाठी घोकादायक बनलेल्या पॉवरहाऊस या मुख्य चौकात तर अतिक्रमण हाताबाहेर गेले आहे. मोठमोठी दुकाने गटारांवर थाटण्यात आली आहेत. काही ठिकाणी दारुची विक्रीही होत आहे. त्यामुळे येथे कायम गर्दी असते. विशेष म्हणजे येथून हाकेच्या अंतरावर पोलीस ठाणे आहे. तरीही होणाऱ्या गर्दीकडे दुर्लक्ष केले जात आहे.
कंपन्यांसाठी असलेल्या मोठमोठ्या बसेस, खासगी कार यांनी तर महामार्ग विकतच घेतल्याचा भास होत आहे. त्यांच्या मनाला वाटेल तेव्हा, कोठेही अशी मोठी वाहने पार्किंग करुन ठेवली जातात. यामुळे समोरुन येणारी वाहनेच दिसत नाहीत. याचा परिणाम म्हणून अपघात होत आहे. अशा दुर्घटना घडल्या की पार्किंग केलेली वाहने तातडीने हलवली जातात. मात्र त्यांच्यामुळे कोणाच्यातरी जीवाला धोका होतोय याचे भान त्यांना नसल्याने असे पार्किंग करणाऱ्यांबाबत नाराजी व्यक्त होत आहे.
गटारांवरील अतिक्रमण, त्यांच्यामुळे रस्त्यांवर उभी केली जाणारी वाहने, दिवस-रात्र केले जाणारे अनधिकृत पार्किंग यामुळे अपघात वाढले असतानाच त्यांच्यावर कोणीही कारवाई करताना दिसत नाही. त्यामुळे संबधित यंत्रणेला बळी गेल्यावरच जाग येणार आहे काय, असा संतप्त सवालही उपस्थित होत आहे.
- यंत्रणेने कारवाई करावी
महामार्गावर होणारे अपघात रोखण्यासाठी बहादूरशेखनाका ते शासकीय विश्रामगृहापर्यंत उड्डाणपूल करण्याची गरज आहे. तसेच अन्य कारणे असल्यास त्याला कारणीभूत ठरणाऱ्यांवर संबधित यंत्रणेने कारवाई करावी.
– संजय तांबडे, माजी नगरसेवक, चिपळूण
- लवकरच धडक कारवाई
महामार्गावर अतिक्रमण केलेल्यांना एक नोटीस देण्यात आली आहे. आणखी दोन नोटिसा देणार असून त्यानंतरही त्यांनी अतिक्रमण काढले नाही तर नगर परिषद व पोलिसांची मदत घेऊन अतिक्रमणावर धडक कारवाई केली जाईल. अनधिकृतपणे होणाऱ्या पार्किंगवर कारवाई करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पोलीस ठाणे यांना पत्र दिले जाणार आहे.
– नाझीम मुल्ला, उपविभागीय अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग, चिपळूण
- महाविद्यालय परिसरातील घटनेचाही विसर
वर्षभरापूर्वी महामार्गावरील एका महाविद्यालय परिसरात गटारांवर असलेल्या टपऱ्यांवर भिंत कोसळून एका विद्यार्थ्याला आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेनंतर येथील टपऱ्या हटवण्यात आल्या होत्या. मात्र आता पुन्हा याही परिसरात गटारांवर पटऱ्या उभ्या राहत आहेत. याकडेही राष्ट्रीय महामार्ग विभाग दुर्लक्ष करीत असून सर्वांनाच घडलेल्या गंभीर घटनेचा विसर पडला आहे.
- अपघातांचे कारण…
दुकानांमध्ये खरेदी करताना वाहने करतात अर्ध्या रस्त्यातच उभी
राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कारवाईकडे दुर्लक्ष








