भुयारात अडकली मुले ः रशियापासून वाचण्यासाठी घेतला भूमिगत आश्रय
रशिया-युक्रेन युद्धाचा सर्वाधिक मार युक्रेनच्या महिला आणि मुलांना झेलावा लागतोय. युद्धाच्या या स्थितीने महिला आणि मुलांना त्यांच्या घरापासून दूर लोटले आहे. युक्रेनमध्ये पुरुषांसाठी अनिवार्य सैन्यसेवा लागू करण्यात आली आहे. अशा स्थितीत देशातील बहुतांश पुरुष सैन्यासोबत मिळून काम करत आहेत. दुसरीकडे महिला आणि मुले एकाकी पडले आहेत. ते कशाप्रकारे तरी लपून स्वतःचा जीव वाचवत आहेत. आता अशाच एका स्टील प्रकल्पात अडकून महिला आणि मुलांना मदतीसाठी याचना केली आहे. त्यांच्या या विनवणीचा व्हिडिओ जगभरात व्हायरल होत आहे.
मारियुपोलच्या या स्टील प्रकल्पातील भूमिगत भुयारांमध्ये लपलेल्या महिला आणि मुलांनी अनेक आठवडय़ांपासून सूर्यच पाहिलेला नाही. दीर्घकाळापासून त्यांनी मोकळय़ा आकाशाखाली श्वास घेतलेला नाही. युक्रेनच्या सैन्याकडून त्यांचा एक व्हिडिओ जारी करण्यात आला आहे. या व्हिडिओत मुले बाहेर जाण्याची आणि मोकळय़ा हवेत श्वास घेण्याची इच्छा व्यक्त करताना दिसून येत आहेत.
रशियन हल्ल्याची भीती
भुयारात असलेल्या महिला आणि मुलांना इच्छा असूनही बाहेर पडता येत नसल्याची स्थिती आहे. हा भाग रशियाच्या हल्लंनी सर्वाधिक प्रभावित भागांपैकी एक आहे. मारियुपोलमध्ये जवळपास दररोजच हवाई हल्ले होत आहेत. अशा स्थितीत या महिला अन् मुलांना भुयारातून बाहेर पडणे शक्य होत नाही.
अन्नधान्य संपतेल
स्टील प्रकल्पाच्या बाहेर चहुबाजूला युद्धाचे वातावरण आहे. तेथे आश्रय घेतलेल्या लोकांकडे आता फार दिवस पुरेल इतकी रसद शिल्लक राहिलेली नाही. या भुयारातून आम्हाला लवकर बाहेर न काढल्यास आमच्यावर उपासमारीची वेळ येऊ शकते असे एक महिला सांगत असल्याचे या व्हिडिओत दिसून येते.









