एकंबे :
महायुती सरकारचा राज्यात सध्या चुकीच्या पद्धतीने कारभार सुरू आहे. कृषिमंत्री सभागृहात पत्ते खेळत आहेत, यावर राज्यभर वादळ उठले तरी मुख्यमंत्री त्यांचा राजीनामा घेत नाहीत. एकाहून एक मंत्री नवनवीन पराक्रम करत आहेत. मात्र मुख्यमंत्री एकाही मंत्र्याचा राजीनामा घेत नाहीत, त्यांची ही हतबलता आहे, असे मला वाटते. सरकार टिकवण्यासाठी मुख्यमंत्री कोणतीही भूमिका घेत नाहीत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी केली.
पक्षाच्या मुंबई येथील प्रदेश कार्यालयात बुधवारी सकाळी 11 वाजता आमदार शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधत सरकारवर टीकेची झोड उठवली. कृषी मंत्र्यांचा पराक्रम समोर येऊन देखील सरकार राजीनामा घेत नाही. या उलट आमचे सरकार असताना विरोधकांनी मागणी केल्यावर नैतिकता दाखवत आमच्या मंत्र्यांनी राजीनामे दिले होते. मात्र भाजपच्या काळात एकाही मंत्र्यांनी राजीनामा दिलेला दिसत नाही. मुख्यमंत्री राजीनामा घेत नाहीत ही त्यांची हतबलताच आहे, असा आरोप देखील आमदार शिंदे यांनी केला.
मंत्र्यांच्या राजीनाम्याविषयी महाविकास आघाडी कठोर भूमिका घेणार आहे. लवकरच आम्ही या विषयावर बसून निर्णय घेणार आहोत. कोणत्याही परिस्थितीत मंत्र्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे, अशी आमची भूमिका असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.








