वृत्तसंस्था /भोपाळ
गेल्या दोन-तीन दिवसांपासून मध्यप्रदेशात गाजत असलेल्या आदिवासी युवकावरील लघुशंकेचे प्रकरण आता आणखीनच चर्चेत आले आहे. पीडित आदिवासी युवकासह त्याच्या कुटुंबियांचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आपल्या निवासस्थानी आदरातिथ्य केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पीडित आदिवासीचा हात धरून त्याला आपल्या घरात प्रवेश दिला. तसेच खुर्चीवर बसवून त्याचे पाय धुतल्यानंतर ओवाळणीही केली. शिवराज यांनी शाल देत सर्व कुटुंबियांचा सन्मान करण्याबरोबरच दिलगिरीही व्यक्त केली. ‘आपल्याला या घटनेने दु:ख झाले आहे. मी तुमची माफी मागतो. तुमच्यासारखे लोक माझ्यासाठी देवासारखे आहेत.’ असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. दुसरीकडे, मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर पीडित आदिवासींनी आपल्या भावनाही मुख्यमंत्र्यांसमोर व्यक्त केल्या. तसेच अंगावर लघुशंका करण्यासंबंधी घडलेल्या घटनेचीही सविस्तर माहिती दिली. आदिवासी युवकावर लघुशंका केल्याप्रकरणी संबंधित प्रवेश शुक्ला याला मंगळवारी रात्री उशिराने अटक करण्यात आली होती. तसेच गुन्हेगाराचे घरही बुलडोझर वापरून पाडण्याची कारवाई केली आहे.









