मिरवणुकीत सहभाग घेत दिला संस्कृती रक्षणाचा संदेश : आमदार चंद्रकात शेट्यो यांनीही धरला ढोलाचा ठेका
प्रतिनिधी/ डिचोली
डिचोली शहरात आयोजित शिमगोत्सव मिरवणुकीत यावर्षी लाभलेला अत्यंत चांगला प्रतिसाद आणि लोकांनीही या कलाकारांना दिलेली दाद, यामुळे डिचोलीतील शिमगोत्सव अधिकच फुलला. लोकांचा उत्साह पाहून डिचोलीत शिमगोत्सव मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनाही मैदानात उतरण्याचा मोह आवरला नाही.
सांखळीतील शिमगोत्सव मिरवणुकीचे उद्घाटन केल्यानंतर डिचोलीतील शिमगोत्सव मिरवणुकीत सहभाग घेऊन मुख्यमंत्र्यांनी आपल्या पारंपरिक संस्कृतीबद्दल असलेले प्रेम दाखवून दिले. डिचोलीत शिमगोत्सवातील एक रोमटामेळ पथक तालावर येऊन नाचत असतानाच या पथकात समाविष्ट ढोल वाजविण्याची इच्छा मुख्यमंत्र्यांना झाली व त्यांनी हातात ढोलाची काठी घेऊन तालावर ढोलाचा ठेका धरला. यावेळी त्यांच्या समवेत असलेल्या डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्यो यांनीही मुख्यमंत्र्यांच्या मागे असलेल्या ढोलाचा ताबा घेतला आणि या दोन्ही नेत्यांनी रोमटामेळाच्या तालावर ढोल बडवत या शिमगोत्सवात लोकांचे लक्ष वेधून घेतले.
सांखळीतही मुख्यमंत्र्यांकडून ‘ओस्सय… ओस्सय..’ चा गजर
सांखळीतील शिमगोत्सवात मुख्यमंत्र्यांनी ‘ओस्सय… ओस्सय..’ चा गजर करत वातावरणात उत्साह निर्माण केला. त्यानंतर उपस्थितांना मार्गदर्शन केले. सांखळीतील शिमगोत्सव हा ‘सर्व धर्म समभाव’ जपणारा शिमगोत्सव असून त्यात संस्कृती व परंपरा जपण्याचा मंत्र मुख्यमंत्र्यांनी दिला. व्यासपीठावर यावेळी त्यांनी समेळावरील साथीदारांसमवेत ढोल वाजवत या शिमगोत्सवाला प्रारंभ केला. साखळीतील शिमगोत्सवानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी डिचोली येथील शिमगोत्सवात सहभागी झाले. यावेळी त्यांनी संस्कृती व परंपरा जपताना त्यात स्वत:ला रमवून घेत सहभाग दाखवावा, असे आवाहन केले. या कलेच्या जनत संवर्धनाची केवळ भाषणेच न करता त्यात रममाण होऊनही आपले योगदान देण्याचा मंत्र मुख्यमंत्र्यांनी या शिमगोत्सवात गोमंतकीयांना दिला.









