काँग्रेसचे गोवा प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांचा सल्ला
पणजी ; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मध्यप्रदेशात धार्मिक वक्तव्ये करून काँग्रेसवर दोषारोप ठेवले म्हणून काँग्रेस पक्षाने त्यांचा कडक शब्दात निषेध केला आहे. पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी सावंत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. हिंदू धर्माबाबत नको ते बोलून सावंत हे धार्मिक द्वेष पसरवत आहेत. ज्वलंत प्रश्न सामान्य जनतेला भेडसावत असताना तेथील लक्ष विचलित करण्यासाठी ते धर्मावर बोलत असल्याचा ठपका पाटकर यांनी ठेवला आहे. सावंत यांनी हिंदू धर्म धोक्यात आहे, असे मध्यप्रदेशात सभेत म्हटले होते. त्याबाबत काँग्रेस उपाध्यक्ष सुनील कवठणकर यांनी आश्चर्य व्यक्त करून भाजपची सत्ता असताना हिंदू धर्म कसा काय धोक्यात येऊ शकतो? असा प्रश्न उपस्थित केला आहे. गोव्यात तर धार्मिक सलोखा आहे, आणि हिंदू तर कधीच धोक्यात आलेले नाहीत, मग आताच सावंत यांना हिंदूंचा धोका कसा काय दिसतो? अशी विचारणा कवठणकर यांनी केली.
बेकारी, महागाई, महिलांची सुरक्षा असे अनेक प्रश्न ऐरणीवर असताना सावंत यांना ते सोडून धर्म सुचतो असे सांगून कवठणकर यांनी त्यांच्यावर टीका केली. भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी सावंत यांना तसे धर्मावर बोलण्यासाठी भाग पाडले असावे, असे पाटकर यांनी नमूद केले. भाजपचे हिंदूत्व फक्त जनतेची दिशाभूल करण्यासाठी असून भाजप सरकारला हिंदूंची मंदिरे वाचवता येत नाहीत, असा टोला कवठणकर यांनी मारला आहे. सावंत यांनी धर्मावर बोलणे अपेक्षित नाही, तर त्यांनी जनतेच्या प्रश्नावर बोलावे. काँग्रेस व धर्म यांची सांगड घालू नये. काँग्रेस नेहमीच सर्व धर्मांचा जातीय आदर केला असून कोणालाही दुखावलेले नाही, असे पाटकर म्हणाले.









