त्यांच्यात माणुसकी ठासून भरलीय : रमेश तवडकर
पणजी : सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांनी आपल्यावर झालेल्या हल्ल्याचा संशय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यावर व्यक्त करणे म्हणजे केवळ सवंग प्रसिद्धीसाठी केलेला प्रयत्न आहे. कारण रामा काणकोणकर यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात कोणत्याही मंत्र्यांचे नाव घेतले नव्हते. तरीही आता त्यांनी मुख्यमंत्री सावंत यांचे नाव घेऊन केवळ जनतेला संभ्रमात टाकण्याचे काम केले आहे, असे कला व संस्कृती खात्याचे मंत्री रमेश तवडकर यांनी सांगितले. मंत्री तवडकर म्हणाले की, रामा काणकोणकर यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यावर गंभीर आरोप केल्याने आपल्याला खूप वाईट वाटले. कारण मुख्यमंत्री सावंत यांना आपण अनेक वर्षांपासून ओळखतो. ते व्यक्ती म्हणून खूप चांगले आहेत. शिवाय ते सुसंस्कृत आहेत. शिवाय ते सर्वांना बरोबर घेऊन जाणारे आहेत. सामाजिक कार्यकर्त्यांवर हल्ले करण्याइतपत ते खालच्या पातळीवर कधीच जाऊ शकत नाहीत. कारण त्यांचा स्वभाव हा राजकारणाच्या पलिकडे सांगायचे झाल्यास त्यांच्यात माणुसकी ठासून भरलेली आहे. तरीही रामा काणकोणकर यांनी केलेले आरोप हे उपचारानंतर केलेच कसे? असा प्रश्न उपस्थित होतो. रामा काणकोणकरकरवी मुख्यमंत्री सावंत यांच्यावर आरोप करायला लावणारा मास्टर माईंड कोण आहे? हे जनतेसमोर यायला हवे, असेही तवडकर म्हणाले.









