रोटरी शिवकालीन शस्त्रप्रदर्शन : तरुणाईची सर्वाधिक उपस्थिती : शिवप्रेमींनी प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन
बेळगाव : छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यातील सरदार येसाजी कंक यांच्या पराक्रमाची साक्ष देणारी तलवार पाहण्यासाठी बेळगावच्या शिवप्रेमींची अलोट गर्दी होत आहे. रोटरी क्लब ऑफ बेळगाव साऊथच्यावतीने आयोजित शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाला दुसऱ्या दिवशीही तुफान प्रतिसाद मिळाला. शालेय विद्यार्थी व महाविद्यालयीन तरुणांची संख्या सर्वाधिक दिसून आली. येसाजी कंक यांनी ज्या तलवारीच्या साहाय्याने शिवाजी महाराजांना दिलेला शब्द पाळला ती तलवार पाहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. संग्रहातील तलवारींविषयी माहिती देताना येसाजी कंक यांचे 14 वे वंशज सिद्धार्थ कंक म्हणाले, हैदराबादजवळील गोवळकोंडा येथे राजा कुतुबशहा यांच्यासमोर हत्ती व येसाजी कंक यांची झुंज लावण्यात आली. वयाच्या 50 व्या वर्षी येसाजी कंक यांनी एका जंगली हत्तीची सोंड धडावेगळी करत आपल्या पराक्रमाची चुणूक दाखविली.
ज्या तलवारीने हत्तीची सोंड धडावेगळी केली, तीच तलवार सध्या बेळगावच्या शिवप्रेमींना पाहता येत आहे. त्याबरोबरच आणखी एक तलवारही फोंड्याच्या इतिहासाची जाणीव करून देते. गोव्यामध्ये पोर्तुगीजांनी आपला बराच जम बसविला होता. तरीदेखील फोंडा किल्ल्यावर येसाजी कंक यांनी आपली सत्ता ठेवली होती. 1683 मध्ये पोर्तुगीज अधिकाऱ्याने या किल्ल्यावर आक्रमण केले. त्यावेळी 300 सैन्यांच्या मदतीने तब्बल 10 दिवस पोर्तुगीजांशी प्रखर लढा देण्यात आला. या लढाईतील येसाजी कंक यांची तलवार प्रदर्शनात असल्याने अधिकाधिक शिवप्रेमींनी प्रदर्शनाला भेट देऊन या ऐतिहासिक प्रतिकांची माहिती घ्यावी, असे आवाहन सिद्धार्थ कंक यांनी केले. मराठा मंदिर येथे सुरू असलेले शिवकालीन शस्त्र, मराठा आरमार व रांगोळी प्रदर्शन सकाळी 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत खुले आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रदर्शन पूर्णपणे मोफत ठेवण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे सहकारी यांच्या सुंदर रांगोळ्या रेखाटण्यात आल्या आहेत.
आज लोकसंस्कृतीचा जागर
प्रदर्शनासोबत गुरुवार दि. 13 रोजी सायंकाळी 5.15 वाजता सांघिक देखावा स्पर्धा आयोजित केली आहे. सायंकाळी 6.30 वा. लोकसंस्कृती नाट्याकला संस्था खानापूर प्रस्तुत शाहीर अभिजीत कालेकर लिखित मराठी लोकसंस्कृतीची ओळख करून देणारा मराठमोळा कार्यक्रम ‘जागर लोकसंस्कृतीचा’ हा कार्यक्रम होईल. संस्कृती, संस्कार, परंपरा, इतिहास, प्रबोधन, विनोद व मनोरंजन यांची सांगड घालणारा हा उत्तम कार्यक्रम असणार आहे. रात्री 8.30 वा. गडसंवर्धनाची माहिती दिली जाणार आहे.









