केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री तसेच तेलगू देसम पक्षाचे प्रमुख एन. चंद्राबाबू नायडू यांची अलिकडेच भेट झाली आहे. या भेटीदरम्यान सुमारे तासभर चर्चा झाली आहे. या भेटीनंतर दोन्ही पक्ष चालू वर्षात तेलंगणात होणारी विधानसभा निवडणूक तसेच पुढील वर्षी होणारी लोकसभा निवडणूक आणि आंध्रप्रदेश निवडणूक एकत्र लढणार असल्याचे मानले जात आहे. दोन्ही पक्षांनी यासंबंधी अद्याप स्वत:चे पत्ते उघड केलेले नाहीत, परंतु पडद्याआडून बऱ्याच घडामोडी सुरू असल्याचे मानले जात आहे.

आंध्रप्रदेशच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ सुरू आहे. राज्यात 2024 च्या लोकसभा निवडणुकीसोबत विधानसभा निवडणूक देखील होणार आहे. यामुळे सर्वच राजकीय पक्ष स्वत:ची समीकरणे जुळवू पाहत आहेत. अशा स्थितीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला जन्म दिला आहे. 5 वर्षांनंतर भाजप आणि तेदेप पुन्हा एकत्र येऊ शकतात असे बोलले जात आहे. अमित शहा आणि चंद्राबाबू नायडू यांची ही भेट अचानक झाल्याने अनेक कयास वर्तविण्यात येत आहेत. तसेही यापूर्वी देखील 2024 साठी दोन्ही पक्ष एकत्र येण्याची चर्चा रंगू लागली होती. याचबरोबर मागील वर्षी झालेल्या राष्ट्रपती निवडणुकीत तेदेपने भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता.
आताच चर्चा का होतेय?
2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा अन् विधानसभा निवडणुकीसाठी दोन्ही पक्ष एकत्र येण्याची चर्चा पहिल्यांदाच होत नसून मार्च महिन्यापासूनच अशाप्रकारचे कयास वर्तविले जात होते. मार्च महिन्यात तेदेपच्या एस. सेल्वी या अंदमान-निकोबार बेटसमुहात पोर्टब्लेयर नगरपरिषदेच्या अध्यक्ष म्हणून निवडून आल्या होत्या. सेल्वी या भाजपच्या समर्थनामुळेच नगराध्यक्ष होऊ शकल्या होत्या. मागील वर्षी झालेल्या तडजोडीनुसार ही निवड झाली होती. मागील वर्षी 24 प्रभाग असलेल्या पोर्टब्लेयरमध्ये भाजपने 10 जागा जिंकल्या होत्या. तर किंगमेकर म्हणून उदयास येत 2 जागा जिंकणाऱ्या तेदेपच्या समर्थनाने नगर परिषदेची सत्ता मिळविली होती. याचमुळे 11 जागा जिंकूनही काँग्रेसला नगर परिषदेच्या सत्तेपासून मुकावे लागले होते. त्यावेळी झालेल्या तडजोडीनुसार एक वर्षानंतर भाजपने तेदेपच्या सेल्वी यांना नगराध्यक्ष पद दिले आहे. सेल्वी आता या पदावर दोन वर्षांपर्यंत राहणार आहेत.
रालोआपासून वेगळे का झाले?
2014 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान सुमारे 10 वर्षांनी चंद्राबाबू नायडू यांचा पक्ष रालोआत परतला होता. 2014 ची निवडणूक दोन्ही पक्षांनी एकत्रितपणे लढली होती. परंतु 2018 येईपर्यंत दोन्ही पक्षांचे मार्ग वेगळे झाले हेते. फेब्रुवारी 2018 मध्ये संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना चंद्राबाबू नायडू यांचा तेलगू देसम पक्ष आंध्रप्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीवरून सभागृहात गोंधळ घालत होता. अर्थसंकल्पात नायडू यांच्या पक्षाच्या मागणीचा कुठलाच उल्लेख नसल्याने दोन्ही पक्षांमधील संघर्ष वाढला होता. मार्च 2018 मध्ये दोन्ही पक्षांचे मार्ग वेगळे झाले होते. एवढेच नाही तर तेदेपने मोदी सरकारच्या विरोधात अविश्वासाचा प्रस्तावही मांडला होता. या पार्श्वभूमीवर आता 5 वर्षांनी पुन्हा एकदा दोन्ही पक्ष एकत्र येण्याची चाहूल निर्माण झाली आहे.
भाजप अन् नायडू
चंद्राबाबू नायडू हे निवडणुकीपूर्वी नव्या सहकाऱ्यासोबत जाण्याचे कयास व्यक्त होणारी ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही विविध वेळा नायडूंनी स्वत:चे सहकारी बदलले आहेत. 1978 मध्ये काँग्रेसमधून स्वत:ची राजकीय कारकीर्द त्यांनी सुरू केली होती. तर 1980 मध्ये ते काँग्रेस सरकारमध्ये मंत्री देखील राहिले होते. 1982 मध्ये जेव्हा एन. टी. रामाराव यांनी काँग्रेसच्या विरोधात नवा पक्ष स्थापन केला तेव्हा देखील नायडू हे काँग्रेसमध्येच राहिले होते. 1982 च्या निवडणुकीत चंद्राबाबू नायडू हे पराभूत झाले होते. तर त्यांचे सासरे एन.टी. रामाराव हे राज्याचे मुख्यमंत्री झाले होते. यानंतर नायडू यांनी रामाराव यांच्या पक्षात प्रवेश केला होता. 1984 मध्ये रामाराव यांचे सरकार पाडविण्याचा प्रयत्न झाला असताना नायडू यांनीच बिगर-काँग्रेस आमदारांची मोट बांधून रामाराव यांचे सरकार वाचविले होते. परंतु याच चंद्राबाबू यांनी नायडू यांनी 1995 मध्ये स्वत:च्या सासऱ्यांच्या पक्षावर नियंत्रण मिळवत राज्याचे मुख्यमंत्रिपदही पटकाविले होते. 1996 मध्ये केंद्रात संयुक्त मोर्चा सरकार स्थापन झाले होते. ही आघाडी निर्माण करणाऱ्या महत्त्वाच्या नेत्यांमध्ये नायडू यांचा समावेश होता. तर 1998 मध्ये त्यांनी गट बदलत रालोआत प्रवेश केला होता. 1998 मध्ये अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले होते. तर 2004 मध्ये रालोआचा पराभव झाल्यावर नायडूंनी याकरता गुजरातमधील दंगली आणि नरेंद्र मोदींच्या प्रतिमेला कारणीभूत ठरवत रालोआतून काढता पाय घेतला होता. त्याच्या 10 वर्षांनी म्हणजेच 2014 मध्ये नायडू हे पुन्हा रालोआत सामील झाले. आश्चर्याची बाब म्हणजे 2014 मध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली रालोआने निवडणूक लढविली होती. तसेच राज्य विधानसभा निवडणुकीत रालोआने यश मिळविल्याने चंद्राबाबू नायडू हे पुन्हा मुख्यमंत्री झाले होते.

आंध्रप्रदेशातील सद्यस्थिती
आंध्रप्रदेशच्या 175 सदस्यीय विधानसभेत सध्या वायएसआर काँग्रेसला बहुमत आहे. वायएसआर काँग्रेसचे 147 आमदार आहेत. तर मुख्य विरोधी पक्ष असलेल्या तेदेपचे केवळ 19 आमदार आहेत. राज्याचे अन्य प्रमुख विरोध असलेले काँग्रेस अन् भाजपचा येथे एकही आमदार नाही. तेलगू सुपरस्टार पवनकल्याण यांच्या पक्षासोबत भाजपची आघाडी आहे. पवन कल्याण यांचा जनसेना पक्ष हा भाजप अन् तेदेपच्या जवळीकीमुळे नाराज असल्याचे बोलले जात आहे. तसेच पवन कल्याण यांच्या पक्षाकडून 2024 ची निवडणूक स्वबळावर लढविण्याची तयारी केली जात असल्याचे समजते.
भाजपची रणनीति
कर्नाटकातील पराभवानंतर दक्षिणेत भाजप अधिकच कमकुवत झाला आहे. अशा स्थितीत भाजपला आता नवे सहकारी शोधण्याची निकड भासू लागली आहे. आंध्रप्रदेशात स्वत:चा प्रभाव निर्माण करण्याची भाजपची दीर्घकाळापासून इच्छा आहे. चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षाची साथ मिळाल्यास भाजपला आंध्रप्रदेशात मोठा बूस्टर मिळणार आहे. परंतु याचबरोबर एकीकडे नायडू अन् अमित शाह यांची भेट झाल्यावर केंद्र सरकारने आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्यासाठी मोठा अनुकूल निर्णय घेतला आहे. आंध्रप्रदेशात पोलावरम प्रकल्पावर काम सुरू आहे. या प्रकल्पासाठी अतिरिक्त निधीची गरज होती. हा निधी उपलब्ध करण्याची तयारी केंद्राने दर्शविली आहे. केंद्राच्या या मदतीमुळे हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होऊ शकणार आहे. तेदेप अन् वायएसआर काँग्रेस यांच्याबाबतीत भाजप कशाप्रकारे संतुलन साधतेय हे आता महत्त्वाचे ठरणार आहे. नायडू अन् जगनमोहन रेड्डी हे एकत्र येणे अशक्य मानले जाते, अशा स्थितीत भाजपलाच या दोघांपैकी एकाची निवड करावी लागणार आहे. जगनमोहन रेड्डी यांनी अनेक विषयांवर केंद्र सरकारला समर्थन केले आहे. केंद्राने आंध्रप्रदेशच्या धरण प्रकल्पाला निधी दिल्यावर रेड्डी यांच्या पक्षाने नव्या संसद भवनाच्या उद्घाटनावर बहिष्कार टाकण्यास नकार दिला. यामुळे विरोधी पक्षांना मोठा झटका बसला. तर चंद्राबाबू नायडू यांची मागील काही वक्तव्ये पाहिल्यास भाजपबद्दलची त्यांची कटूता कमी झाल्याचे जाणवते. याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नेतृत्वही त्यांना पसंत पडू लागले आहे.
आंध्रप्रदेश भाजपसाठी महत्त्वाचे
आंध्रप्रदेशात लोकसभेच्या 25 जागा आहेत. या राज्यात काही प्रमाणात यश मिळविण्यासाठी भाजपला रेड्डी किंवा नायडू यांच्यापैकी एकाची साथ लागणार आहे. भाजपने मागील लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागलेल्या 120 मतदारसंघांवर लक्ष केंद्रीत केले आहे. या मतदारसंघांपैकी बहुतांश जागा या दक्षिण भारतातील आहेत. अशा स्थितीत पक्ष आता आघाडी राजकारणाद्वारे स्वत:चा प्रभाव वाढवू पाहत आहे.

बदलली राजकारणाची दिशा
आंध्रप्रदेशात अलिकडच्या काळात चंद्राबाबू नायडू यांनी स्वत:च्या राजकारणाची दिशा बदलली आहे. नायडू आता हिंदुत्वाशी निगडित मुद्दे देखील उपस्थित करत आहेत. आंध्रप्रदेशातील जगनमोहन रे•ाr यांच्या सरकारवर ख्रिश्चनधार्जिणे असल्याचा आरोप वारंवार होत असतो. अशा स्थितीत चंद्राबाबू नायडू यांची नवी भूमिका महत्त्वाची मानली जात आहे. मधल्या काळात आंध्रप्रदेशात झालेल्या हिंदू देवतांच्या मूर्तीच्या तोडफोडीवरून जनतेत संताप असल्याचे मानले जात आहे. एकाचवेळी दोन रणनीतिंवर ते काम करत असल्याचे मानले जातेय. राज्यात विरोधी पक्षाची जागा घेऊ पाहणाऱ्या भाजपला ते संदेश देत आहेत. तसेच जगनमोहन रेड्डी यांच्या सरकारला जोरदारपणे लक्ष्य करत आहेत.
दोन्ही बाजू होताहेत सज्ज…
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष अशा दोन्ही बाजू भक्कमपणे तयारी करीत आहेत, असे दिसून येत आहे. विरोधी पक्षांनी नुकतीच पाटणा येथे बैठक घेऊन सत्ताधाऱ्यांना एकत्रितरित्या तोंड देण्याचा निर्धार व्यक्त केला. या बैठकीला 15 पक्षांच्या नेत्यांची उपस्थिती होती. तथापि, जे पक्ष पुन्हा रालोआ किंवा भाजपच्या जवळ येऊ इच्छित आहेत, अशा पक्षांपैकी एकाचीही या बैठकीला उपस्थिती नव्हती. काही पक्ष विरोधी पक्षांची आघाडी आणि सत्ताधारी आघाडी या दोन्हींपासून अंतर ठेवून आहेत, तेही अनुपस्थित होते.
भाजपची अन्य पक्षांशीही चर्चा
अकाली दल हा जनसंघाच्या काळापासूनचा भाजपचा सर्वात जुना मित्रपक्ष आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेपेक्षाही भाजप आणि अकाली दल यांचा स्नेह जुना आहे. आता भाजप आणि अकाली दल हे पक्ष पुन्हा एकमेकांच्या जवळ येण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे दिसून येते. मध्यंतरीच्या काळात अकाली भाजपपासून दूर गेले होते. तसेच भाजपने आपल्या 18 जुलैच्या बैठकीला बिहारमधील लोकजनशक्ती पक्षाचे नेते चिराग पास्वान आणि हिंदुस्थान अवाम पक्ष या पक्षाचे नेते जितनराम मांझी यांनाही आमंत्रित केले आहे.
उमाकांत कुलकर्णी









