तब्बल 800 कोटींचा तोटा : 27 वर्षानंतर यजमानपद स्वीकारुनही पीसीबीच्या हाती भोपळा : खेळाडूंच्या पगाराला कात्री
वृत्तसंस्था/ लाहोर
मिनी वर्ल्डकप म्हणून ख्याती असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे नुकतेच पाकिस्तानमध्ये आयोजन करण्यात आले होते. यजमान म्हणून त्यांना खूप मान हवा होता. प्रचंड पैसा कमवण्याच्या उद्देशाने 27 वर्षांनी चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन करणे, पीसीबीला भलतेच महागात पडले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आयोजनामुळे पीसीबीला जवळपास 800 कोटींचा तोटा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे, टूर्नामेंटचे आयोजन करण्यासाठी झालेल्या खर्चामुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला जोरदार धक्का बसला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन करण्यात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने तब्बल 85 मिलियन अमेरिकी डॉलर खर्च केले. जे भारतीय रुपयांमध्ये जवळपास 869 कोटी रुपये होतात. संपूर्ण स्पर्धेवर 869 कोटी रुपये खर्च करूनही पाकिस्तानचा संघ हा चॅम्पियन्स ट्रॉफीचे फक्त 2 सामने खेळू शकला. तर एकाही सामन्यात त्यांना विजय मिळवता आला नाही. पाकिस्तान क्रिकेट मंडळ आपल्या संघाच्या सामन्यांना प्रेक्षक आणू शकले नाही. इतर देशांच्या सामन्यांना तर स्टेडियममध्ये कोणीही फिरकले देखील नाही. अगदी मोजकेच प्रेक्षक स्टेडियममध्ये उपस्थित असल्याने पीसीबीला फारसा महसूल देखील मिळाला नसल्याचे बोलले जात आहे.
नुकसानीमुळे पीसीबीला जोरदार धक्का
पाकिस्तानचे चॅम्पियन्स ट्रॉफीमधील सामने रावळपिंडी, लाहोर व कराची याठिकाणी झाले तर टीम इंडियाचे सर्व सामने दुबईत झाले. फायनलही दुबईत झाल्याने पीसीबीला याचा मोठा फटका बसला. याशिवाय, पीसीबीने मायदेशातील सामने आयोजित करण्यासाठी तब्बल 869 कोटी रुपये खर्च केले होते. असे असूनही पीसीबीला केवळ 60 कोटी रुपयांचा महसूल मिळाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अर्थात, चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन करत प्रचंड महसूल मिळवणे हा पीसीबीचा उद्देश होता पण त्यांचा हा प्रयत्न फसला असून पीसीबीला याचा मोठा फटका बसला आहे.
खेळाडूंच्या मॅच फीमध्ये कपात
आता, हे नुकसान भरुन काढण्यासाठी पीसीबीने आपल्या खेळाडूंच्या मॅच फीमध्ये मोठी कपात केली आहे. ही कपात जवळपास 60 ते 70 टक्क्यांच्या घरात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याशिवाय, फक्त नॅशनल टी 20 चॅम्पियनशिपवरच नाही तर देशांतर्गत क्रिकेटच्या विकासावरही करण्यात येत असलेल्या खर्चात पीसीबी कपात करणार असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच खेळाडूंच्या राहण्याच्या व्यवस्थेत देखील मोठा बदल करणार असल्याचे संकेत पीसीबीने दिले आहेत.









