देशात सरासरीपेक्षा सात टक्के कमी, मध्य भारतात चार टक्के तर दक्षिण भारतात पंधरा टक्के कमी पाऊस झाला आहे. विशेषत: महाराष्ट्रात कोकण वगळता सर्वत्र टंचाईची स्थिती निर्माण झाली असून सांगली आणि जालना हे दोन जिल्हे दुष्काळाच्या छायेत आहेत. इतर काही जिह्यातील स्थितीही जवळपास तशीच आहे. पाऊस कमी झाल्याने खरीपाच्या पेरण्या झाल्या नाहीत, जिथे पेरण्या झाल्या तिथे उगवण चांगली नाही. अनेक ठिकाणी पिके धोक्यात आली आहेत आणि त्यामुळे ग्रामीण जीवन उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. पावसाने निर्माण केलेल्या या आव्हानामुळे महाराष्ट्राची यंदा सत्वपरीक्षा पाहिली जाईल अशी स्थिती आहे. पश्चिम महाराष्ट्रात आधी महापुराचे थैमान माजते की काय अशी शक्यता गृहीत धरून सरकारने जून महिन्याच्या प्रारंभालाच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची पथके तैनात केली होती. ऐनवेळी उशीर व्हायला नको म्हणून ही पथके आधीच जिह्यांच्या मुख्यालयात मुक्कामाला आली होती. याच काळात हवामान खात्यातील तज्ञांना मात्र चिंता सतावत होती ती एल निनो सक्रिय होण्याची. नेमकी ही चिंता प्रत्यक्षात आली आणि पावसाने उसंत घेतली. जून पूर्ण संपला तरी पावसाचा पत्ता नव्हता. जुलैत खरिपाच्या पेरण्या सुरू होतील अशी स्थिती असताना पावसाने हात आखडता घेतला आणि आता ऑगस्ट संपत आला तरी पुढच्या पाच दिवसांचा अंदाज वर्तवण्याशिवाय हवामान खात्याच्या हाती काही उरलेले नाही. परतीच्या पावसाचा प्रारंभ होण्यापूर्वी थोडासा पाऊस सक्रिय होईल अशी शक्यता तज्ञ व्यक्त करीत आहेत. पावसाने किमान सरासरी गाठली तरी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न संपुष्टात यावा आणि खरीप हातचा गेला तरी रब्बीची सुरुवात चांगली होऊन शेतकऱ्याच्या हाती एक तरी पीक लागावे अशी प्रार्थना आता होऊ लागली आहे. सांगली सारख्या जिह्यात ताकारी, म्हैसाळ, टेंभू आणि वाकुर्डे बुद्रुक अशा उपसा सिंचन योजना कार्यान्वित असल्या तरी ज्या शिराळा तालुक्यात चांदोली धरण आहे तेथेही पाण्याची ओढ जाणवत आहे. पलूस आणि वाळवा सारखे सधन तालुकेही पाण्याच्याबाबतीत चिंतेत आहेत. जत, आटपाडीत टँकर सुरू झाले आहेत तर मिरज, खानापूर, कवठेमंकाळ वगैरे तालुक्यांमध्ये पाण्याचा तुटवडा जाणवू लागला आहे. कोल्हापूर जिह्यातील दहा तालुके हे कोकणपट्ट्याच्या जवळचे असल्याने प्रारंभीच्या पावसाच्या ओढीनंतर तिथली स्थिती थोडी सुखावह आहे. मात्र, शिरोळ हातकणंगले सारख्या तालुक्यांमध्ये पाण्याची कमतरता भासू लागल्याने शेतीपंपावर भर देऊन इथली पिके जगवण्याचा प्रयत्न शेतकरी करत आहेत. मात्र यंदा पावसाने तिथेही चिंता निर्माण केली आहे. रत्नागिरी आणि मुंबईसारख्या भागातही जर पावसाची सरासरी गाठता आली नसेल तर मध्य महाराष्ट्रातील इतर जिल्हे, विदर्भ आणि मराठवाड्यात काय स्थिती आहे याचा केवळ अंदाजही भय निर्माण करणारा आहे. वातावरणातील बदलाचे परिणाम असे प्रत्येकवेळी आपले वेगळे रूप दाखवत आहेत. कधी महापूर तर कधी टंचाईची परिस्थिती हे आता नित्याचे होऊ लागलेले आहे. याचा परिणाम समाज जीवनावर होत असतो. सरासरीपेक्षा देशभर पाऊस कमी होत असेल तर त्याचा परिणाम देशातील अन्नधान्याच्या उत्पादनावर आणि उपलब्धतेवर होतो. परिणामी अन्नटंचाई आणि महागाई यांना सामोरे जावे लागते. देशातील उद्योग क्षेत्राची कितीही प्रगती झाली तरीसुद्धा या देशाला योग्य मार्गाने जाण्यासाठी चांगला पाऊस पडणे आणि चांगले पीक येणे ही बाब अत्यंत आवश्यक आहे. भारत हा जगातील प्रमुख अन्न उत्पादक देश असला तरी त्याचबरोबर तो जगातील एक प्रमुख अन्नधान्य खरेदीदारसुद्धा आहे. भारताने अन्न खरेदी सुरू केली की इतर जगाला त्याचा धसका घ्यावा लागतो. पूर्वी एकदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी भारतीय लोक ज्यादा खाऊ लागल्यामुळे जगात अन्नटंचाही निर्माण झाली आहे असे वक्तव्य केले होते. त्या काळातसुद्धा अन्न टंचाई हा मुख्य मुद्दा होता आणि आज तर भारतात महागाई गगनाला भिडलेली असताना सध्याची टंचाई, भविष्यात काय वाढून ठेवले आहे याकडे इशारा करत आहे. देशांतर्गत बाजारपेठेत अन्नाचा साठा पुरेसा आहे असे सांगत गेल्या वर्षभरात सरकार टप्प्याटप्प्याने आपल्या गोदामातून गहू आणि तांदूळ बाहेर काढत आले आहे. मात्र काही लाख टन गहू बाजारात आणले तरीसुद्धा भाव वाढ कमी करणे सरकारला शक्य झालेले नाही. त्यांची सगळी कसरत सुरू होती ती यंदाच्या खरिपात चांगले पिकेल आणि गोदामे भरून ठेवता येतील यावर. कोरोनाच्या काळात मोकळी झालेली गोदामे सरकारला आता भरून ठेवायची आहेत. मात्र कमी झालेला पाऊस आणि त्याचा खरीपावर झालेला परिणाम यामुळे कितपत उत्पादन झाले आहे, याबाबत शंका निर्माण करत आहे. सरकारने अद्याप त्याबाबत आकडेवारी जाहीर केली नसली तरी सुद्धा महाराष्ट्रातील जिल्हावार पेरणीची स्थिती लक्षात घेतली तर ती चिंता वाढवणारीच आहे. आता या संपूर्ण वर्षात शेतकऱ्याच्या हातात फक्त रब्बीचा एकच हंगाम राहिलेला आहे. परतीच्या पावसाचे वेळापत्रक जर व्यवस्थित राहिले तरच शेतकऱ्यांच्या हातात काहीतरी उरणार आहे आणि ते उरले तरच देशालासुद्धा तरण्याइतपत अन्नधान्य हाती लागणार आहे. त्यादृष्टीने देशातील अन्नधान्य उत्पादन वाढण्या इतपत पाऊस परतीच्या पावसाच्या निमित्ताने व्हावा अशी देशभराची इच्छा आहे. मात्र निसर्ग जी संकटे निर्माण करत आहे त्या परिस्थितीला मात देत अन्नधान्य पिकवणे आणि ती हवामानाच्या माऱ्यापासून वाचवून बाजारात पाठवून त्याला योग्य भाव मिळवणे हे शेतकऱ्यासमोरचे मोठे आव्हान आहे. अशा या काळात केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शेतकऱ्याला चार पैसे मिळण्याच्या काळात सरकारची धोरणे सुसंगत असली पाहिजेत. शेतकरी आणि जनता दोघांचेही हित साधणारा समन्वय सरकारला राखता येणे शक्य असते. मात्र, मागणी आणि पुरवठ्याच्या दबावात जर सरकार गडबडले तर काय होते याची स्थिती सध्या कांद्याच्या बाबतीत देश अनुभवतो आहे. पावसाचे आव्हान अशा अनेक आव्हानांना समोर आणून ठेवणार आहे.
Previous Articleस्विगीची बाजारात लिस्ट होण्याची तयारी गतिमान
Next Article भारतीय-बांगलादेश हॉकी संघांची आज सलामीची लढत
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








