नवी दिल्ली येथे नुकतेच पद्म पुरस्कार प्राप्त तज्ञांचे चर्चासत्र पार पडले. वैद्यकीय क्षेत्राला आपले आयुष्य समर्पित केलेल्या या तज्ञांना आंतरराष्ट्रीय स्तरावरही मानाचे स्थान आहे. भारतामध्ये मधुमेह, हृदयरोग आणि कर्करोग यांसारख्या असंसर्गजन्य आजारांनी साथरोगांसारखे प्रमाण गाठले आहे. त्यामुळे देश एका गंभीर आरोग्य संकटाच्या उंबरठ्यावर उभा आहे, असा इशारा वैद्यकीय तज्ञांच्या या गटाने दिला आहे. या परिस्थितीवर तातडीने उपाययोजना केल्या नाहीत तर या आजारांनी ग्रस्त असणाऱ्यांची संख्या अतोनात वाढेल, अशी भीतीही व्यक्त करण्यात आली आहे.
हृदयरोग हे जगभरातील लोकांच्या मृत्यूचे एक प्रमुख कारण आहे, ज्याचा परिणाम दरवर्षी लाखो लोकांवर होतो. यामध्ये हृदय आणि रक्तवाहिन्यांवर परिणाम करणाऱ्या विविध आरोग्य समस्यांचा समावेश आहे. रक्तवाहिन्या अरुंद किंवा ब्लॉक झाल्यावर या समस्या उद्भवू शकतात, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकसारख्या गंभीर घटना घडू शकतात. धूम्रपान आणि अल्कोहोलचा वापर उच्च रक्तदाब (उच्च रक्तदाब)उच्च एलडीएल (वाईट) कोलेस्ट्रॉल लठ्ठपणा किंवा जास्त वजन असणे, आळशी जीवनशैली, अस्वास्थ्यकर आहार (संतृप्त चरबी, मीठ किंवा साखरेचे प्रमाण जास्त) तीव्र ताण हृदयरोगाचा कौटुंबिक इतिहास, वय, पुरुषांसाठी 45 आणि महिलांसाठी 55 वर्षांनंतर धोका वाढतो. ‘इंडियन हार्ट असोसिएशनच्या’ अहवालानुसार भारतातील तीन पैकी एक महिला हृदयरोगामुळे मृत्यू पावते आणि 50 वर्षांखालील महिलांमध्ये हृदयविकाराच्या झटक्यानंतर मृत्यू होण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांत दुप्पट झाले आहे. 2022 मध्ये ‘अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजि’च्या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार गेल्या दशकांत 35 ते 50 वयोगटांतील लोकांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण 15 टक्के वाढले आहे. शहरीकरण, बसून राहण्याची जीवनशैली, तणावाचे वाढते प्रमाण आणि चुकीच्या आहाराच्या सवयी यामुळे हा धोका प्रचंड प्रमाणात वाढला आहे. हृदयरोग हा गंभीर आहे परंतु निरोगी सवयी आणि नियमित वैद्यकीय सेवेद्वारे तो मोठ्या प्रमाणात टाळता येतो. जोखीम जाणून घेऊन, लक्षणे ओळखून आणि स्मार्ट जीवनशैली निवडून, तुम्ही तुमच्या हृदयाचे रक्षण करू शकता आणि दीर्घ आणि निरोगी आयुष्य जगू शकता. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला धोका असू शकतो किंवा तुम्हाला कोणतीही लक्षणे जाणवत असतील, तर कृपया तुमच्या डॉक्टरांशी बोला. तुमच्या हृदयाचे आरोग्य महत्त्वाचे आहे!
मागील काही काळापासून मधुमेहाचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. तरुणांपासून वयोवृद्धांनादेखील हा आजार जडत आहे. अनेक डॉक्टर्स आणि संशोधक यांबाबत नागरिकांना सतर्कतेचा इशारा देत आहेत. ‘दि. लॅन्सेट डायबेटिज अँड एन्डोक्रोनॉलॉजी’ या जर्नलमध्ये मधुमेहाची सद्यस्थिती दर्शविणारा एक अहवाल प्रसिद्ध झाला आहे. या अहवालानुसार देशांतील एकूण लोकसंख्येपैकी 11 टक्के लोकांना मधुमेह हा आजार जडलेला आहे. याशिवाय शहरांतील 15.4 टक्के तर ग्रामीण भागांतील 15.2 टक्के लोकांना ‘प्री-डायबेटिज’ ची लक्षणे आढळली आहेत. सध्या देशात प्री-डायबेटिजचे प्रमाण बरेच आहे. अनेकवेळा प्री -डायबेटिजचे निदान होण्यास उशीर होतो. त्यामुळे मधुमेहाचे प्रमाण वाढते. सामान्य व्यक्तींच्या तुलनेत प्री-डायबेटिज असलेल्या व्यक्तींच्या शरीरात साखरेचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे प्री-डायबेटिज असलेल्या व्यक्तीला मधुमेह (टाईप 2)होण्याची शक्यता जास्त असते. योग्य आहार, रोज न चुकता व्यायाम, वजन कमी करणे, पुरेशी झोप याबाबींचे पालन करणे आवश्यक आहे.
कर्करोग हा आजार जगातील सर्वांत भयंकर आजारांपैकी एक मानला जातो. सर्वांत मोठी धोकादायक बाब म्हणजे सुरुवातीच्या टप्प्यात हा आजार ओळखू येत नाही. लक्षणे अगदी साधीसुधी वाटतात आणि रुग्णाला उशिरा त्याची जाणीव होते. तोपर्यंत परिस्थिती गंभीर असते. कर्करोगाचे निदान वेळेवर झाल्यास उपचार मिळून रुग्ण पुढे ठणठणीत बरा होऊन सामान्य जीवन जगू शकतो. दिवसागणिक देशात कर्करोगाच्या रुग्णसंख्येत वाढ होते आहे. विशेषत: लहान मुलांमधील कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे. जगात कर्करोगाची सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या आघाडीच्या देशांपैकी भारत एक आहे. भारताला जगातील कर्करोगाची राजधानी म्हणूनही संबोधले जाते आहे. 2020 मध्ये वार्षिक कर्करोग रुग्णांची संख्या 14 लाख इतकी होती. आता 2025 मध्ये वाढून ती 15 लाख सत्तर हजार इतकी झाली आहे. या सगळ्याला जळजळ वाढवणारे प्रोसेसज्ड खाद्य पदार्थ तसेच कार्सिनोजेनने भरलेले वायुप्रदूषण आणि आरोग्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करीत ‘फास्ट फूड’चे सेवन आणि हवामानातील बदल प्रामुख्याने कारणीभूत आहेत. भारतात फुफुसाचा कर्करोग होणाऱ्या रुग्णांचे सरासरी वय 59आहे तर अमेरिकेत हेच वय 70आणि ब्रिटनमध्ये 75आहे. भारतात आता दरवर्षी एक दशलक्ष कर्करोगी सापडतात आणि त्यात चार टक्के लहान मुले आहेत.
या तिन्ही ‘आरोग्याच्या महाशत्रूंनी’ मोठे आव्हान उभे केले आहे. तातडीने उपाययोजना केल्या जाण्याची नितांत गरज आहे. देशाने प्रगती जरी केलेली असली गरीब आणि श्रीमंत यांच्यातील दरी खूप वाढल्याने असमानता कायम आहे. औषधांचे दर आणि रुग्णालयांचे बिल यावर कठोर नियम करण्याची गरज आहे. अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या ‘बौद्धिक संपदा’ याचा वापर करून भरमसाठ नफेखोरी करताना दिसून येतात. त्यामुळे ही औषधे सामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर जातात. लाखो लोकांचे जीव वाचवता येणार असतील तर सरकारने ‘बौद्धिक संपदा’ संरक्षण काढून घेऊन किंमती केल्या तर या तिन्ही महाशत्रूंना पराजित करणे शक्य आहे. व्यक्तिगत पातळीवर सजगता आणि सामाजिक पातळीवर प्रबोधन तसेच सरकारी पातळीवर आरोग्याचे कवच अशा व्युहरचनेने या आरोग्याच्या या तिन्ही महाशत्रूंना वेसण घालणे नक्कीच शक्य होईल.
प्रा. डॉ. गिरीश नाईक








