पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यानंतर देशभरात विकासाची जी गती वाढली, तिला गोवाही अपवाद राहिलेला नाही. मोठे रस्ते, महामार्ग, मोठे पूल, विमानतळ, स्टेडियम्स, हॉस्पिटले, इमारती, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय महोत्सव, परिषदा आणि बरेच काही असे हे विकासपर्व सुरु असून त्यात ‘गोव्याचा गोवा’ राखणे हे मोठे आव्हान आहे सरकारसमोर आणि जनतेसमोरही!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यानंतर देशभरात विकासाची जी गती वाढली, तिला गोवाही अपवाद राहिलेला नाही. देशात यापूर्वी विकासकामे झाली नव्हती, असे अजिबात नाही. अटलबिहारी वाजपेयी म्हणजे समस्त भारतीयांच्या लाडक्या अटलजी सरकार काळातही लक्षणीय विकास झाला होता. यादी फार मोठी आहे. तत्पूर्वीच्या नेहरु, इंदिरा गांधी, लालबहादुर शास्त्री, राजीव गांधी यांच्या काळातही देशभरात विकासकामे झालेली आहेत. मात्र उपरोल्लेखित सर्व सरकारे आणि आताचे मोदी सरकार यांच्यातील अधोरेखित करण्यासारखा फरक म्हणजे विकासकामांची गती आणि दर्जा! “देश मे जो सत्तर साल मे नही हुआ, वह सात साल मे हुआ है’’। हे आज पुन्हा पुन्हा ऐकायला मिळते ती अतिशयोक्ती नाही. मात्र गती कशाचीही असेना, ती नियंत्रित असणे आवश्यक आहे, अन्यथा जेवढय़ा गतीने जे होते तेवढय़ाच गतीने ते नामशेषही होऊन जाण्याची शक्यता असते. त्यामुळे या विकासपर्वाच्या झपाटय़ात छोटासा, सुंदरसा असलेला गोवा कुठल्या कुठे गायब होऊ शकतो, हेही ध्यानात ठेवावे लागेल.
गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून देशातच नव्हे, तर विदेशांतही नावलौकिक प्राप्त झालेल्या मोदींचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जे नाव पुढे केले ते गोव्यातून गोव्याने! तेंव्हापासून आतापर्यंत मोदींचे गोव्यावर असलेले प्रेम वेळोवेळी दिसून आले आहे. राष्ट्रीयच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही ते गोव्याची प्रशंसा करतात आणि सढळहस्ते आर्थिक मदतही करतात, परिणामी गोव्यात पुन्हा दुसरे विकासपर्व सुरु झाले आहे. गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांनी त्यावेळी पुढच्या पन्नास वर्षांचा दृष्टिकोन ठेवून विकासपर्व राबविले म्हणून गोवा उशिरा स्वतंत्र होऊनही एक समर्थ राज्य म्हणून देशात उभे राहिले. आताही पुढच्या पन्नास वर्षांचा विचार करुन विकासकामे केली जात आहेत. मात्र भाऊसाहेबपर्वातील विकास आणि आताचा हा विकास यामध्ये अधोरेखित होणारा फरक असा की त्या विकासात ‘गोव्याचा गोवा’ राखण्याकडे कटाक्ष होता जो आताच्या विकासात नाही. त्यामुळे या विकासपर्वात खरा गोवा आपले अस्तित्व गमावू लागला असून त्यातून गोवा कुठे पोहोचेल याचे भयाण चित्र सुजाण गोवेकराच्या डोळय़ांपुढे थयथयाट करत आहे.
शिक्षणामध्ये संख्यात्मकदृष्टय़ा चांगली प्रगती केलेल्या गोव्यात दर्जात्मकतेचा अभाव आहे, हे वारंवार सिद्ध झालेले आहे. सरकारी क्षेत्र सोडले तर आज खासगी क्षेत्रात कुशल व अकुशल कामात गोवेकर मागे पडले आहेत. ‘ब्लॅक बोर्ड’पासून ‘डिजिटल बोर्ड’ पर्यंत उच्च शिक्षणाच्या कक्षा रुंदावत असतानाच प्राथमिक शिक्षणाची अवस्था चिंताजनक बनल्याचे अहवाल येत आहेत. याच स्तरावर अत्यंत आवश्यक असलेल्या कोकणी, मराठी शिक्षणाकडे दुर्लक्ष करुन गोव्याने स्वतःच्या पायावर कुऱहाड मारुन घेतली आहे. या दोन्ही मातृभाषाच नव्हे, संपूर्ण गोमंतकीय अस्मिता या विकासपर्वात गटांगळय़ा खात आहेत. सर्वबाजुने दुष्टचक्रात अडकलेल्या गोव्याला नवे राष्ट्रीय शिक्षण धोरण तारु शकेल काय? बौध्दिक असो वा भौतिक, विकास करताना आपल्याकडे अगोदरचे जे चांगले आहे, ते टिकवून धरुन नव्याचा स्वीकार करायचा असतो. गोव्याच्या खाणी त्यावेळीही समृद्ध होत्या, म्हणून भाऊसाहेबांच्या सरकारने त्या कुणाला ओरबाडून टाकायला दिल्या नाहीत. अर्थव्यवस्थेला त्या मोठा आधार होत्या, पण त्यावरच अवलंबून न राहता शेती, बागायती, लघुउद्योग यालाही तेवढेच प्राधान्य दिले. पर्यटन व्यवसायही त्यांनीच सुरु केला, पण कसा? “पर्यटक येतील, त्यांना आमचा निसर्ग आणि आमचे आदरातिथ्य द्यायचे. त्यांना प्रेमाचा निरोप असा द्यायचा की ते आपल्या पुढच्या पर्यटनाचा विचार करु लागतील तेव्हाही ते गोव्याचाच विचार करतील. हे करताना एवढी काळजी घ्यायची, एवढा कटाक्ष पाळायचा की पर्यटकांना आम्ही डोक्यावर घेऊन नाचणार नाही’’. काँग्रेस सत्ताकाळात खाणींकडे सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून पाहिले आणि ओरबाडून टाकल्या. परिणामी गेली बारा वर्षे खाण व्यवसाय बंद आहे. भाऊसाहेबांचे विचार कोणी वाचलेच नाहीत तर अभ्यासणार कोण? आज नेमके उलटे सुरु आहे.
पर्यटकांना डोक्यावर घेऊन नाचले जात आहे, सरकारी व खासगी स्तरावरही! पर्यटनाच्या नावाखाली जे काही चालले आहे, त्यामध्ये मूळ गोमंतकीय जनतेच्या विचाराकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष केले जात आहे. केरळ, तामिळनाडू, आंध्रप्रदेश काश्मिरनेही आपल्याला कशाप्रकारचे पर्यटक हवेत हे ठरवलेले आहे. गोव्याने ठरविणे सोडाच विचारही सुरु केलेला दिसत नाही. त्यामुळे पंचवीस-तीस वर्षांअगोदर आणि अलीकडे दहा-बारा वर्षांपूर्वी गोव्यात येऊन गेलेल्या दर्जेदार पर्यटकांना आता पुन्हा गोव्यात आल्यानंतर ‘नको हा गोवा’ म्हणण्याची वेळ येते. गोव्याचे विकासपर्व पहा… केवळ एका वस्तीत असलेला वेश्याव्यवसाय गोव्याच्या संपूर्ण किनारपट्टीत फोफावला. देशविदेशांतील महिलांचा व्यापार गोव्यातून होतोय. गावातील मोजकी चारपाच असणारी ‘तावेर्न’ बंद पडली आणि गावात पन्नास-साठ बार अँड रेस्टॉरंट्स आली, पत्त्यांचे जुगार कालबाहय़ ठरले. जळीस्थळी कॅसिनो आले. विडी-सिगरेट संपतेय आणि गांजा व अन्य ड्रग्ज फोफावलेय.
कोणलाही कोणाचा खून करायचा असेल तर त्याला गोव्यात आणून त्याचा ‘गेम’ केला जातो. कोण कुठले बाहेरुन गोव्यात येतात, कंपनी असल्याचे भासवतात आणि कोटय़वधी रुपयांचा गंडा घालून जातात. एकंदरीत निसर्गसपंन्न गोवा, शांत सुस्वभावी गोवा, देवभूमी गोवा, कलेचे माहेरघर गोवा म्हणजे गुन्हेगारी अड्डा बनत चालला आहे. हे सारे कमी म्हणून की काय सर्व शहरांमध्ये आणि पर्यटनस्थळांवर भिकाऱयांनी गोव्याची लक्तरे वेशीवर मांडली आहेत, पुन्हा हे सर्व भिकारीही परप्रांतीय. केवळ पर्यटन या गेंडस नावाखाली खुलेआम जे होत आहे त्यात गोवेकरांचा सहभाग नसताना गोव्याची बदनामी होत आहे. दळणवळणासह संपर्काच्याही सर्व सुविधांनी सुसज्ज असलेला गोवा अनेक क्षेत्रांतील माफियांचाही अड्डा बनलेला असल्याने आज गोव्याची मोठी जमीन परप्रांतीयांकडे गेली आहे. एका बाजूने गोमंतकीयत्व हरवत आहे आणि दुसऱया बाजूने गोव्याची बदनामी होत आहे. मोठे रस्ते, महामार्ग, मोठे पूल, विमानतळ, स्टेडियम्स, हॉस्पिटले, इमारती, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय महोत्सव, परिषदा आणि बरेच काही असे हे विकासपर्व सुरु असून त्यात ‘गोव्याचा गोवा’ राखणे हे मोठे आव्हान आहे सरकारसमोर आणि जनतेसमोरही!
राजू भिकारो नाईक









