प्रतिनिधी/ बेळगाव
वन्यप्राण्यांकडून शेती पिकांचे नुकसान वाढले आहे. धामणे एस., बेकिनकेरे, बसुर्ते, अतिवाड, कट्टणभावी, बंबरगा, कोनेवाडी, कुद्रेमनी आदी डोंगर क्षेत्राशी लागून असलेल्या गावांतून पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे वनखाते पंचनामा करून नुकसान भरपाई कधी देणार? असा प्रश्न नुकसानग्रस्त शेतकऱ्यांतून विचारला जात आहे.
गवे, तरस, डुक्कर, साळिंदर, मोर, हत्ती आदी वन्यप्राण्यांकडून शेती पिकांचे नुकसान होऊ लागले आहे. अलीकडे वनक्षेत्रात वाढ झाल्याने वन्यप्राण्यांची संख्या वाढली आहे. विशेषत: गवीरेड्यांच्या संख्येत भरमसाट वाढ झाली आहे. त्यामुळे पिकांचे नुकसान वाढले आहे. वनखाते या प्राण्यांच्या कायमस्वरुपी बंदोबस्तासाठी पाऊले उचलणार का? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

तालुक्यातील काही गावांना डोंगर आणि वनक्षेत्राचा भाग लागून आहे. दरम्यान, अलीकडच्या काही वर्षात वनक्षेत्रात झाडांची संख्या दुपटीने वाढली आहे. लाकुडतोड कमी झाल्याने डोंगर दाट झाडीने वेढला आहे. त्यामुळे या परिसरात वन्यप्राण्यांना नैसर्गिक अधिवास प्राप्त झाला आहे. त्यामुळे बेळगावपासून 10 ते 15 किलोमीटरवर असलेल्या कट्टणभावी, बेकिनकेरे डोंगर क्षेत्रात गव्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. दरम्यान, या वन्यप्राण्यांकडून उभ्या पिकात हैदोस घातला जात आहे. त्यामुळे शेतीपिकांचे नुकसान होत आहे. विशेषत: जोंधळा, भाजीपाला आणि कडधान्य पिके माती मोल होत आहेत. आधीच नैसर्गिक संकटामुळे बळीराजा अडचणीत सापडला आहे. त्यातच वन्यप्राण्यांच्या नुकसानीमुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत.
वन्यप्राण्यांच्या मुक्त संचारामुळे हजारो एकर परिसरातील ऊस, भात, जोंधळा, भुईमूग, भाजीपाला आणि कडधान्य पिकांचे नुकसान होत आहे. वन्यप्राण्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे वनखात्याने डोंगर परिसरात वन्यप्राण्यांसाठी योग्य व्यवस्था करणे आवश्यक आहे. विशेषत: पावसाळा कमी झाल्यानंतर वन्यप्राण्यांकडून नुकसान होत आहे. चारा आणि पाण्याचा तुटवडा निर्माण झाला की वन्यप्राणी डोंगर पायथ्याशी असलेल्या शिवारात घुसत आहेत. यासाठी डोंगर क्षेत्रातच वनखात्याने प्राण्यांसाठी चारा आणि पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.

दरवर्षी शेकडो परिसरातील पिकांचे नुकसान
वन्यप्राण्यांकडून दरवर्षी नोव्हेंबर ते मे महिन्यापर्यंत शेकडो एकर परिसरातील पिकांचे नुकसान ठरलेले आहे. मात्र, वनखाते यासाठी कोणतेच प्रयत्न करताना दिसत नाही. उभ्या पिकात धुडगूस घालून वन्यप्राणी पिके फस्त करतात. त्यामुळे शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा तोटा सहन करावा लागतो. नुकसानग्रस्त भागाचा पंचनामा करून केवळ शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले जाते. प्रत्यक्षात शेतकऱ्यांना नुकसानभरपाई किती मिळते, हा संशोधनाचा विषय आहे. योग्य नुकसानभरपाई मिळावी आणि वन्यप्राण्यांचा कायमस्वरुपी बंदोबस्त करावा, यासाठी वनखात्याने कठोर पाऊले उचलण्याची गरज व्यक्त होत आहे. वनखात्याकडून दरवर्षी लाखो रोपांची लागवड केली जात आहे. त्यामुळे वनक्षेत्र दाट झाडीने वाढले आहे. याबरोबरच वन्यप्राण्यांची शिकार कमी झाल्याने हत्ती, गवी, तरस, मोर, डुक्कर, साळिंदर यांची संख्या वाढली आहे. या वन्यप्राण्यांकडूनच शेती पिकाचे नुकसान होऊ लागले आहे.









