फ्रान्स, जमैका, मोरोक्को शेवटच्या 16 संघांत दाखल
वृत्तसंस्था /मेलबर्न
2023 च्या येथे सुरू असलेल्या फिफाच्या महिलांच्या विश्व करंडक फुटबॉल स्पर्धेत बलाढ्या ब्राझील, पनामा तसेच जर्मनी यांचे आव्हान समाप्त झाले आहे. दरम्यान फ्रान्स, जमैका आणि मोरोक्को यांनी शेवटच्या 16 संघांमध्ये स्थान मिळवले. या स्पर्धेतील बुधवारी मेलबर्नच्या रेक्टँग्युलर स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात बलाढ्या ब्राझील संघाला शेवटच्या 16 संघांत स्थान मिळवण्याकरिता विजयाची नितांत गरज होती पण जमैकाने या सामन्यात शेवटपर्यंत ब्राझीलला गोल करण्यापासून रोखल्याने हा सामना गोलशून्य बरोबरीत राहिला आणि ब्राझीलचे पुढील फेरीत स्थान मिळवण्याचे स्वप्न अधुरे राहिले. फ गटात फ्रान्स, ब्राझील, जमैका आणि पनामा या संघांचा समावेश होता. या गटातून फ्रान्स आणि जमैका यांनी शेवटच्या 16 संघांमध्ये प्रवेश केला. फ्रान्सचा संघ 7 गुणासह पहिल्या स्थानावर राहिला. प्राथमिक गटात फ्रान्सने 3 पैकी 2 सामने जिंकले असून एक सामना बरोबरीत राखला. जमैकाचा संघ 5 गुणासह दुसऱ्या स्थानावर राहिला. जमैकाने 3 पैकी 1 सामना जिंकला असून दोन सामने बरोबरीत सोडवले. ब्राझील 4 गुणासह तिसऱ्या स्थानावर राहिला. ब्राझीलने 3 पैकी एक सामना जिंकला असून एक सामना गमवला तर एक सामना बरोबरीत सोडवला. पनामा संघ या गटात शेवटच्या म्हणजे चौथ्या स्थानावर राहिला. त्यांनी आपले सर्व सामने गमवले.
ब्राझील आणि जमैका यांच्यातील बुधवारचा सामना शेवटच्या क्षणापर्यंत चुरशीचा झाला. ब्राझीलला हा सामना जिंकणे सोपे नव्हते. या सामन्यात ब्राझील संघाला गोल करण्याच्या अनेक संधी मिळाल्या होत्या पण गोलपोस्टजवळील त्यांचे फटके अचूक नसल्याने त्यांना शेवटपर्यंत गोलविना रहावे लागले. ब्राझीलच्या खेळाडूंना 18 फटके मारण्याची संधी मिळाली त्यापैकी 8 फटके गोलपोस्टच्या जवळून गेले. या लढतीमध्ये ब्राझीलच्या खेळाडूंनी परस्परामध्ये 600 पासेस दिले त्यापैकी 76 टक्के पासेस अचूक होते. संपूर्ण सामन्यामध्ये जमैकाला केवळ गोल करण्याच्या तीन संधी उपलब्ध झाल्या पण त्यांना या संधीचा फायदा घेता आला नाही. जमैकातर्फे 235 पासेस नोंदवले गेले आणि त्यापैकी 50 टक्के पासेस अचूक होते. जमैकाकडून 8 फाऊल्स नोंदवले गेले तर त्यांच्या एका खेळाडूल पिवळे कार्ड दाखवण्यात आले.
फ्रान्सची पनामावर मात
फ्रान्स आणि पनामा यांच्यातील सामन्यात फ्रान्सने पनामाचा 6-3 अशा गोलफरकाने दणदणीत पराभव केला. या सामन्यात फ्रान्सने सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत पनामावर आपले वर्चस्व ठेवले होते. या लढतीमध्ये फ्रान्सच्या के. डायनीने शानदार हॅट्ट्रीक नोंदवली तर मॅले लेक्रार, ली गॅरेक आणि विकी बेचो यांनी प्रत्येकी एक गोल केला. पनामातर्फे मार्टा कॉक्स, योमिरा पिनझोन आणि लिनेथ सिडेनो यांनी प्रत्येकी एक गोल नोंदवला. या सामन्यात फ्रान्सला 26 शॉट्सची संधी मिळाली त्यापैकी 10 शॉट्स अचूक ठरले. फ्रान्सच्या खेळाडूंनी 490 पासेस दिले आणि त्यापैकी 83 टक्के पासेस अचूक होते. पनामाला 6 शॉट्स मिळाले त्यापैकी 3 शॉट्सवर गोल केले. पनामाने 205 पासेस दिले तसेच त्यांच्याकडून 8 फाऊल्स नोंदवले गेले व एका खेळाडूला पिवळे कार्ड दाखवण्यात आले.
बरोबरीमुळे जर्मनी स्पर्धेबाहेर
अन्य एका सामन्यात बलाढ्या जर्मनीला जबरदस्त धक्का बसला आहे. या स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच जर्मनीच्या फुटबॉल संघाला प्राथमिक फेरीतूनच बाद व्हावे लागत आहे. गुरुवारी झालेल्या सामन्यात दक्षिण कोरियाने जर्मनीला 1-1 असे बरोबरीत रोखले. हा सामना बरोबरीत राहिल्याने या स्पर्धेत पदार्पण करणाऱ्या मोरोक्को संघाला शेवटच्या 16 खेळाडूत स्थान मिळवण्याचा मार्ग दक्षिण कोरियाने मोकळा करून दिला. पर्थमध्ये झालेल्या सामन्यात मोरोक्कोने कोलंबियाचा 1-0 असा निसटता पराभव केला. या विजयामुळे मोरोक्कोने च गटात सहा गुण मिळवले या गटात जर्मनी संघाला 4 गुणासह तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. जर्मनीच्या महिला संघाने 2003 आणि 2007 साली या स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले होते. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्या संयुक्त यजमानपदाने सुरु असलेल्या 2023 च्या फिफाच्या विश्वकरंडक महिला फुटबॉल स्पर्धेत जर्मनीकडे संभाव्य विजेता म्हणून पाहिले जात होते. दक्षिण कोरियावर विजय मिळवला असता तर मात्र जर्मनीला शेवटच्या 16 संघात स्थान मिळवता आले असते. या स्पर्धेत जर्मनीला च गटातील झालेल्या यापूर्वीच्या सामन्यात कोलंबियाकडून पराभव पत्करावा लागला होता. कोलंबियाने जर्मनीचा 2-1 असा पराभव केला होता.









