वृत्तसंस्था/ मीरपूर
हरमनप्रित कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या बांगलादेशच्या दौऱ्यावर तीन सामन्यांची वनडे मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात यजमान बांगलादेशने भारताचा पराभव करून 1-0 अशी आघाडी मिळवली आहे. आता बुधवारी उभय संघामध्ये दुसरा सामना खेळवला जात आहे. भारतीय महिला क्रिकेट संघासमोर मालिका गमावण्याची भिती निर्माण झाली आहे. दरम्यान या मालिकेत आव्हान जिवंत ठेवण्यासाठी भारतीय संघाला फलंदाजीत सुधारणा करावी लागेल.
या मालिकेतील गेल्या रविवारी झालेल्या पहिल्या सामन्यात बांगलादेशच्या फिरकी गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना झटपट गुंडाळण्यात यश मिळवले. बांगलादेशची गोलंदाजी या सामन्यात अधिक प्रभावी ठरली कारण भारतीय फलंदाजांना अधिक धावा जमवता आल्या नाहीत. बांगलादेश महिला क्रिकेट संघाचा या सामन्यातील हा ऐतिहासिक विजय ठरला. भारतीय संघाला पहिल्यांदाच वनडे प्रकारात बांगलादेशकडून पराभव पत्करावा लागला होता.
2024 साली आयसीसीची महिलांची विश्वचषक क्रिकेट स्पर्धा बांगलादेशमध्ये होत असल्याने भारतीय संघाला आतापासूनच अधिक जागरुक रहावे लागेल. बांगलादेशचे गोलंदाज घरच्या खेळपट्टीवर पुन्हा प्रभावी ठरू शकतील. दरम्यान भारतीय फलंदाजीमध्ये सुधारणा होणे काळाची गरज आहे. बांगलादेशमधील खेळपट्ट्या संथ असून फलंदाजांना धावा घेताना झगडावे लागत असल्याचे चित्र रविवारच्या सामन्यात दिसून आले. या खेळपट्टीवर चेंडू खूपच खाली राहात असल्याने फलंदाजाला तो मारणे अवघड जात होते. रविवारच्या पहिल्या सामन्यात भारतीय फलंदाजी सपशेल अपयशी ठरली होती. सलामीची फलंदाज स्मृती मानधना, कर्णधार हरमनप्रित कौर, प्रिया पुनिया, दीप्ती शर्मा, रॉड्रीग्ज यांना आपली फलंदाजी सुधारावी लागेल. रिचा घोषची उणीव भारतीय संघाला या मालिकेत जाणवत आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय गोलंदाजी अचूक झाली नाही. भारतीय गोलंदाजांनी 19 वाईड चेंडू टाकले होते. तब्बल चार महिन्यांच्या विश्रांतीनंतर भारतीय महिला संघ बांगलादेशमध्ये मालिका खेळत असल्याने त्यांना खेळपट्टी आणि वातावरणाशी जुळवून घेताना थोडे अवघड जात असले तरी हा संघ मालिकेतील पुढील दोन सामन्यात निश्चित दर्जेदार खेळ करेल असा विश्वास संघाचे गोलंदाज प्रशिक्षक रजिब दत्ता यांनी व्यक्त केला आहे.
भारत : हरमनप्रित कौर (कर्णधार), स्मृती मानधना, दीप्ती शर्मा, शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रीग्ज, यास्तिका भाटिया, हर्लिन देओल, देविका वैद्य, उमा छेत्री, अमनज्योत कोर, प्रिया पुनिया, पूजा वस्त्रकर, मेघना सिंग, अंजली सर्वानी, मोनिका पटेल, राशी कनोजिया, अनुशा बॅरेडी आणि स्नेह राणा
बांगलादेश : निगार सुलताना (कर्णधार), नाहिदा अख्तर, मुर्शिदा खातून, फर्गेना हक, शोभना मोस्तरी, शोरना अख्तर, रिटू मोनी, लता मोंडल, दिशा विश्वास, सलमा खातून, मारुफा अख्तर, शर्मिन अख्तर, संजिदा अख्तर, रेबिया खान, सुलताना खातून, फईमा खातून आणि शमिमा सुलताना.
सामन्याची वेळ : सकाळी 9 वाजता.









