आयपीएल साखळी फेरीत आज सनरायजर्स हैदराबादविरुद्ध लढत
मुंबई / वृत्तसंस्था
यंदाच्या आयपीएल मोहिमेतील आपले अस्तित्व कायम राखण्यासाठी झगडत असलेल्या दिल्ली कॅपिटल्सची आज (गुरुवार दि. 5) सनरायजर्स हैदराबादविरुद्ध लढत होत आहे. दिल्लीचे मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी अद्याप झगडत असलेल्या अष्टपैलू ललित यादवला सूर गवसणे महत्त्वाचे ठरु शकते. अष्टपैलू ललितवर पाँटिंगने यंदा सलग तिसऱया हंगामात विश्वास दर्शवला. मात्र, ललितला 9 सामन्यात 137 धावा व 8.5 च्या इकॉनॉमी रेटने 4 बळी, असे किरकोळ योगदान देता आले आहे.
मध्यफळीत फलंदाजी करत असताना ललितचा स्ट्राईक रेट 110 पेक्षाही कमी राहिला असून उत्तम फिनिशर म्हणून प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये दिलेल्या योगदानाची त्याला आयपीएलच्या व्यासपीठावर मात्र पुनरावृत्ती करता आलेली नाही. आतापर्यंत खेळलेल्या 7 डावात त्याला केवळ 6 षटकार खेचता आले आहेत.
9 सामन्यात 5 पराभवांसह 8 गुण ही दिल्लीची कामगिरी योग्य कॉम्बिनेशन होत नाही, असेच दाखवून देत आली आहे. ऍनरिच नोर्त्झेचे रिटेन्शन या संघावरच उलटले असून कुलदीप यादव (17 बळी) व काही प्रमाणात खलील अहमद (11 बळी) यांनी गोलंदाजीत सातत्य राखले आहे. मुस्तफिजूरने काही टप्प्यात उत्तम मारा केला असला तरी 2015 ते 2018 मधील भेदकतेपासून तो बराच दूर आहे.
शार्दुल ठाकुर वेगवान माऱयाच्या बळावर प्रतिस्पर्धी फलंदाजांना पेचात टाकू शकतो. मात्र, आतापर्यंत 9 सामन्यात त्याला केवळ 7 बळी घेता आले आहेत. गतवर्षी इंग्लंड दौऱयात अष्टपैलू योगदान दिल्यानंतर बीफी हे इयान बोथमचे टोपण नाव मिळालेल्या शार्दुलने यंदा आयपीएलमध्ये फलंदाजीतही फारसा करिष्मा दाखवलेला नाही. त्याला आतापर्यंत 7 डावात केवळ 89 धावा करता आल्या आहेत.
कर्णधार रिषभ पंतने (9 सामन्यात 234 धावा) विस्फोटक फलंदाजीची क्षमता दाखवून दिली असली तरी संघाला त्याच्याकडून अद्याप बरीच अपेक्षा असणार आहे. डावाच्या उत्तरार्धात जलद गोलंदाज उमरान मलिकविरुद्ध पंत अशी जुगलबंदी रंगणे अपेक्षित आहे. आश्वासक सुरुवात करणारा पृथ्वी शॉ मागील काही सामन्यात मात्र खराब फॉर्ममध्ये राहिला असून डेव्हिड वॉर्नरसमोर अर्धशतकी खेळीचे शतकात रुपांतर करण्याचे लक्ष्य असणार आहे.
प्रतिस्पर्धी संघ
दिल्ली कॅपिटल्स ः रिषभ पंत (कर्णधार), अश्विन हेब्बार, डेव्हिड वॉर्नर, मनदीप सिंग, पृथ्वी शॉ, रोव्हमन पॉवेल, ऍनरिच नोर्त्झे, चेतन साकरिया, खलील अहमद, कुलदीप यादव, लुंगी एन्गिडी, मुस्तफिजूर रहमान, शार्दुल ठाकुर, अक्षर पटेल, कमलेश नागरकोटी, ललित यादव, मिशेल मार्श, प्रवीण दुबे, रिपल पटेल, सर्फराज खान, विकी ओस्तवाल, यश धुल, केएस भरत, टीम सेफर्ट.
सनरायजर्स हैदराबाद ः केन विल्यम्सन (कर्णधार), अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मॅरक्रम, निकोलस पूरन, अब्दुल समद, प्रियम गर्ग, विष्णू विनोद, ग्लेन फिलीप्स, आर. समर्थ, शशांक सिंग, रोमारिओ शेफर्ड, मार्को जान्सन, जे. सुचित, श्रेयस गोपाल, भुवनेश्वर कुमार, सीन ऍबॉट, कार्तिक त्यागी, सौरभ तिवारी, फझलहक फारुकी, उमरान मलिक, टी. नटराजन.
सामन्याची वेळ ः सायं. 7.30 वा.
बॉक्स
मजबूत गोलंदाजी लाईनअप हे हैदराबादचे बलस्थान
भुवनेश्वर, उमरान, टी. नटराजन व मार्को जान्सन अशा अव्वल गोलंदाजांमुळे सनरायजर्स हैदराबाद या हंगामात लक्षवेधी प्रदर्शन साकारण्यात यशस्वी ठरला असून मजबूत गोलंदाजी लाईनअप हे या संघाचे आजही बलस्थान ठरु शकणार का, हे पहावे लागेल. फक्त चेन्नई सुपरकिंग्सने सनरायजर्सच्या गोलंदाजांची 20 षटकात 200 पेक्षा अधिक धावांची धुलाई केली होती.
फलंदाजीत या संघाचा सलामीवीर अभिषेक शर्माला स्वस्तात बाद करण्यावर दिल्लीला प्रामुख्याने लक्ष केंद्रित करावे लागेल. अभिषेकने आतापर्यंत खेळलेल्या 9 सामन्यात 135 च्या स्ट्राईकरेटने 324 धावांची आतषबाजी केली आहे.
याशिवाय, एडन मॅरक्रम (9 सामन्यात 263 धावा) व राहुल त्रिपाठी (9 सामन्यात 228 धावा) हे फलंदाज देखील सनरायजर्सतर्फे उत्तम योगदान देत आले आहेत.









