वृत्तसंस्था/ चेन्नई
विश्वचषकात आज सोमवारी येथे होणाऱ्या सामन्यात अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यात लढत रंगणार असून चेपॉकच्या खेळपट्टीवर अफगाणिस्तानच्या फिरकीपटूंपासून पाकिस्तानला सावध राहावे लागेल. भारत आणि ऑस्ट्रेलियाविऊद्ध सलग दोन पराभवांनंतर बाबर आझमच्या संघासाठी आज विजय अनिवार्य बनलेला आहे. कारण आणखी एक पराभव स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या त्यांच्या महत्त्वाकांक्षेसमोर गंभीर अडथळा निर्माण करेल.
सध्या ते चार गुणांसह पाचव्या स्थानावर आहेत. परंतु त्यांची निव्वळ धावसरासरी (-0.456) हा चिंतेचा विषय आहे आणि त्यात सुधारणा आवश्यक आहे. पाकिस्तानसाठी मोठी डोकेदुखी ही त्यांची फलंदाजी असून विशेषत: ज्या प्रकारे ते फिरकीपटूंना सामोरे गेले आहेत ते त्यांना चिंतेत पाडणारे आहे. बेंगळूरूरमध्ये फलंदाजीस पोषक खेळपट्टीवरही त्यांच्या फलंदाजांनी ऑस्ट्रेलियन लेगस्पिनर अॅडम झाम्पाला चार महत्त्वपूर्ण बळी दिले. अफगाणिस्तानकडे फिरकीच्या बाबतीत निर्विवाद गुणवत्ता आहे. त्यांचे रशिद खान, मोहम्मद नबी आणि मुजिब उर रेहमान हे सर्वोत्तम खेळाडूंनाही त्रास देऊ शकतात आणि येथे तर खेळपट्टी फिरकीस पोषक राहण्याची शक्यता असल्याने ते खूप त्रासदायक ठरू शकतात.
त्यामुळे पाकिस्तानला त्यांच्या फलंदाजांकडून, विशेषत: बाबरकडून, ठोस प्रयत्नांची आवश्यकता भासेल. बाबरने आतापर्यंत या स्पर्धेत निराश केले आहे. मोहम्मद रिझवान हा सध्याच्या स्पर्धेतील त्यांचा सर्वाधिक धावा (294) करणारा फलंदाज आहे. सौद शकील आणि इफ्तिकार अहमदसारख्या मधल्या फळीतील बाकीच्या फलंदाजांनी त्यांच्यावर विश्वास ठेवण्यासारखी कामगिरी केलेली नाही. पाकिस्तानच्या गोलंदाजीनेही फारशी आशा निर्माण केलेली नाही. डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीने ऑस्ट्रेलियाविऊद्ध पाच बळी घेऊन पुन्हा फार्मात येण्याची काही प्रमाणात चिन्हे दाखविली. पण इतर दोन वेगवान गोलंदाज हॅरिस रौफ आणि हसन अली यांचा फॉर्म चिंतेचा विषय आहे.
पाकिस्तानकडे वेगवान गोलंदाजांना पूरक असे काही चांगले फिरकीपटू नेहमीच राहिलेले असले, तरी यावेळी डावखुरा फिरकी गोलंदाज मोहम्मद नवास आणि लेगस्पिनर शादाब खान, उसामा मीर हे तसे दिसलेले नाहीत. दुसरीकडे, अफगाणिस्तानच्या संघातील सलामीवीर रहमानउल्ला गुरबाज वगळता इतर फलंदाज अपेक्षित कामगिरी करू शकलेले नाहीत. इकराम अलीखिल, अजमतुल्ला उमरझाई आणि हशमथुल्ला शाहिदी यांनी चमक दाखवली असली, तरी त्यांनी कामगिरीमध्ये सातत्य आणण्याची गरज आहे. हल्लीच्या काळात मैदानात पाकिस्तान व अफगाणिस्तान यांच्यातील शत्रुत्व बरेच वाढले असून त्यांच्यात आतापर्यंत सात एकदिवसीय सामने झालेले आहेत आणि ते सारे पाकने जिंकलेले आहेत.
संघ-अफगाणिस्तान : हशमतुल्लाह शाहिदी (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम झद्रान, रियाझ हसन, रहमत शाह, नजीबुल्लाह झद्रान, मोहम्मद नबी, इक्रम अलीखिल, अजमतुल्लाह उमरझाई, रशिद खान, मुजिब उर रहमान, नूर अहमद, फजलहक फाऊखी, अब्दुल रेहमान आणि नवीन उल हक.
पाकिस्तान: बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, फखर झमान, इमाम-उल-हक, अब्दुल्ला शफीक, मोहम्मद रिझवान, सौद शकील, इफ्तिकार अहमद, सलमान अली आगा, मोहम्मद नवाज, उसामा मीर, हॅरिस रौफ, हसन अली, शाहीन आफ्रिदी आणि मोहम्मद वसिम.
सामन्याची वेळ : दुपारी 2 वा.