शहरात खळबळ : विष प्राशन करून संपविले जीवन
प्रतिनिधी/ बेळगाव
सीबीआय चौकशीच्या फेऱ्यात अडकलेल्या कॅन्टोन्मेंट बोर्डचे सीईओ के. आनंद (वय 38) यांनी आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. बेळगावमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याची ही पहिलीच धक्कादायक घटना आहे. यामुळे कॅन्टोन्मेंटसह शहर परिसर हादरला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून डेथ नोटही ताब्यात घेतली आहे.
पोलीस व घटनास्थळावरून उपलब्ध माहितीनुसार, गुरुवारी रात्री कॅन्टोन्मेंट बोर्डच्या कार्यालयातून ते कॅम्प येथील त्यांच्या निवासस्थानी पोहोचले. त्यानंतर शुक्रवारी दिवसभरात बंगल्यातून कोणतीच हालचाल नसल्याने कर्मचाऱ्यांनी शनिवारी सकाळी कॅन्टोन्मेंट बोर्डच्या सदस्यांना माहिती दिली. कॅम्प पोलिसांनाही घटना कळविण्यात आली. पोलिसांच्या उपस्थितीत दरवाजा फोडण्यात आला. यावेळी के. आनंद यांचा मृतदेह त्यांच्या बेडरुममध्ये पडल्याचे दिसून आले. तेथेच विषारी पदार्थांची बाटलीही पडली होती. रक्तस्त्राव झाल्याचेही दिसून आले. तात्काळ वैद्यकीय पथकाला पाचारण करण्यात आले. वैद्यकीय पथकाने के. आनंद यांना मृत घोषित केल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
दरवाजा फोडून आतमध्ये प्रवेश
के. आनंद यांचे घरातील कामगारांशी मोजकेच बोलणे असायचे. यामुळे शुक्रवारी दिवसभरात कामगारांनी खोली बंद असल्याने तितकेसे लक्ष दिले नाही. शनिवारी सकाळी संशय आल्यानंतर दरवाजा फोडून आतमध्ये प्रवेश करण्यात आला. यावेळी मृतदेहाच्या शेजारी पाण्याच्या बाटल्या तसेच विषारी औषधाची बाटली सापडली. मृतदेह दोन दिवसापासून पडून असल्याने रक्तस्त्राव झाल्याचे प्रथम दर्शनी दिसून आले.
घटनास्थळी मराठा लाईट इन्फंन्ट्री रेजिमेंटल सेंटरचे कमांडंट ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांनी तात्काळ भेट दिली. घटनेची माहिती घेऊन दिल्ली येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोनवरून माहिती दिली. याबरोबरच बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ, पोलीस आयुक्त सिद्धरामप्पा व पोलीस उपायुक्त रोहन जगदीश, खडेबाजारचे एसीपी अरुणकुमार कोळ्ळूर, कॅम्प पोलीस स्थानकाचे निरीक्षक अल्ताफ मुल्ला, कॅन्टोन्मेंट बोर्डचे माजी उपाध्यक्ष साजीद सय्यद यांच्यासह इतरांनी घटनास्थळी भेट दिली.
2015 च्या इंडियन डिफेन्स इस्टेट सर्व्हिस बॅचचे के. आनंद हे मागील दीड वर्षापासून बेळगावच्या कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये सीईओ पदावर कार्यरत होते. नेमणुकीपासूनच त्यांची कार्यकीर्द वादग्रस्त ठरली. निर्णय घेताना कॅन्टोन्मेंट बोर्डमधील सदस्य अथवा नागरिकांना विश्वासात न घेणे, भूमिगत जल वाहिन्या घालण्यास केलेला विरोध, तसेच भरती प्रक्रियेत झालेला भ्रष्टाचार यामुळे त्यांची संपूर्ण कार्यकीर्द वादग्रस्त ठरली होती. के. आनंद हे मूळचे चेन्नईचे असून बेळगावमध्ये एकटेच राहत होते. त्यांचे आई, वडील चेन्नई येथे असून दोन बहिणी परदेशात आहेत. त्यांच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात आली असून लवकरच ते बेळगावमध्ये दाखल होणार आहेत.
आठवडाभरापासून सुरू होती चौकशी
कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये 2022 मध्ये 19 पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली. भरती प्रक्रिये दरम्यान मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याची तक्रार काही सामाजिक कार्यकर्त्यांनी बेंगळूर व दिल्ली येथील सीबीआयकडे केली. याची दखल घेऊन गुरुवार दि. 16 पासून बेंगळूर व दिल्ली सीबीआयच्या पथकाने चौकशी सुरू केली. तब्बल आठवडाभर सीबीआयचे पथक बेळगावमध्ये तळ ठोकून होते. कॅन्टोन्मेंट सीईओंपासून भरती झालेल्या उमेदवारापर्यंत सर्वांचीच सखोल चौकशी सुरू होती. गुरुवारपर्यंत के. आनंद या चौकशीला सामोरे गेले होते.
बघ्यांची गर्दी आणि परिसरात दुर्गंधी
कॅन्टोन्मेंट बोर्डच्या सीईओंनी आत्महत्या केल्याचे समजताच कॅम्प परिसरातील नागरिकांनी सीईओ बंगल्याबाहेर धाव घेतली. यामुळे परिसरात मोठी गर्दी झाली होती. गर्दी आवरण्यासाठी पोलिसांनी हुसकावून लावले. मृतदेह दोन दिवसांपासून पडून असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली होती. त्यामुळे मास्क लावून अधिकारी वर्ग बंगल्यात प्रवेश करीत होते.
मृतदेह चेन्नईला रवाना
के. आनंद हे मूळचे तामिळनाडूतील चेन्नईचे ते आपल्या आई, वडिलांचे एकूलते एक चिरंजीव होते. मृत्यूपूर्वी त्यांना रक्ताच्या उलट्या झाल्याचेही उघडकीस आले आहे. शनिवारी सायंकाळी सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात उत्तरीय तपासणी करून त्यांचा मृतदेह चेन्नईला नेण्यात आला. सुरुवातीला पोलिसांनी चेन्नई येथील आनंद यांच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती दिली. त्यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर मृतदेह चेन्नईला पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. कॅन्टोन्मेंटचे काही कर्मचारीही चेन्नईला गेले आहेत.
संशयास्पद मृत्यू प्रकरणाची नोंद
कॅन्टोन्मेंटचे अधिकारी महालिंगेश्वर ताळूकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कॅम्प पोलीस स्थानकात संशयास्पद मृत्यू प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे. सीआरपीसी कलम 174 (सी) अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला असून शवचिकित्सा अहवाल उपलब्ध झाल्यानंतरच सीईओंचा मृत्यू कसा झाला, याचा उलगडा होणार आहे. गुरुवार दि. 23 नोव्हेंबरच्या सायंकाळी 6 ते शनिवार दि. 25 नोव्हेंबरच्या सकाळी 6 या वेळेत ही घटना घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
धक्कादायक
वरिष्ठ अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याची बेळगावातील पहिलीच
घटनास्थळावरून पोलिसांनी ताब्यात घेतली डेथ नोट
मृतदेहाच्या शेजारी पाण्याची तसेच विषारी औषधाची बाटली
नेमणुकीपासूनच के. आनंद यांची कार्यकीर्द वादग्रस्त









