हिंदू संघटनांची निवेदनाद्वारे राष्ट्रपतींकडे मागणी
प्रतिनिधी/ बेळगाव
वक्फ कायद्याला विरोध करण्याच्या निमित्ताने पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार घडवून आणण्यात येत आहे. हिंदूंवर अत्याचार सुरू आहेत. त्यामुळे पश्चिम बंगालमधील परिस्थिती चिंताजनक आहे. दंगेखोरांना आवर घालण्याऐवजी प्रशासन त्यांना पाठीशी घालत आहे. परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा, अशी मागणी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाने केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शनिवारी राष्ट्रपतींना निवेदन पाठवण्यात आले आहे. मुर्शिदाबादमध्ये सुरू झालेल्या दंगलीचे पडसाद संपूर्ण पश्चिम बंगालमध्ये उमटत आहेत. हिंदूंवर हल्ले करण्यात येत आहेत. दोनशेहून अधिक हिंदूंची घरे व दुकाने पेटवण्यात आली आहेत. तिघा जणांचा बळी घेण्यात आला आहे. शेकडो नागरिक जखमी आहेत. महिलांवर अत्याचार करण्यात आले आहेत. 500 हून अधिक हिंदू कुटुंबांनी मुर्शिदाबादमधून पलायन केले आहे. तरीही पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पीडितांची भेट घेण्याऐवजी इमामांच्या भेटी घेत आहेत, असा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.
पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आहे. बांगलादेशी व रोहिंग्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात घुसखोरी सुरू आहे. पाकिस्तान व बांगलादेशी अतिरेकी संघटना सक्रिय झाल्या आहेत. त्यामुळेच हिंदूंविरुद्ध दंगे भडकवले जात आहेत. वेळीच परिस्थिती आटोक्यात आणली नाही तर त्याचे लोण देशभरात पसरण्याची भीती आहे. राष्ट्रीय सुरक्षितता व शांततेसाठी राष्ट्रपतींनी हस्तक्षेप करण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी विजय जाधव, आनंद करलिंगण्णावर, संतोष मादिगर, विनोद पाटील, प्रशांत धाकलुचे, सोमशेखर हिरेमठ, विनायक परीट आदींसह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.









