दिवाळीनिमित्त कोल्हापुरात प्रवाशांची झपाट्याने वाढ
कोल्हापूर : दिपावली सणाला प्रारंभ झाला आहे. यामुळे सर्वत्र आनंदाचे आणि चैतन्याचे बाताबरण आहे. दिवाळी सणासाठी लोक आपल्या गावी येत आहेत. यामुळे रेल्वे, एसटीला प्रवाशांची हाऊसफुल्ल गर्दी असल्याचे चित्र दिसत आहे. प्रवाशांची गैरसोय होऊन म्हणून रेल्वेने विशेष गाडया सोडल्या आहेत. तर एसटी महामंडळांने कोल्हापूर-पुणे मार्गावर जादा बसेसचे नियोजन केले आहे.
दिवाळी सणाला शुक्रवार पासून प्रारंभ झाला असला तरी नोकरीनिमित्त विविध ठिकाणी नोकरी – व्यवसाय करत असलेले नागरिक गेल्या आठवड्यापासून दिवाळी सणासाठी आपल्या गावी येत आहे. यामुळे रेल्वे, एसटीला प्रचंड गर्दी वाढली आहे. याबरोबरच खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसेसलाही गर्दी होत आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागाने कोल्हापूर-पुणे मार्गावर १५० जादा बसेस सोडल्या आहेत. तसेच सोलापूर आणि अन्य मार्गावर जादा बसेसचे नियोजन केले आहे.
जिल्ह्यांतर्गत वाहतूकीचे नियोजन केले आहे. गेल्या दोन दिवसात पुण्याहून कोल्हापूरला येणाऱ्या सर्व बसेस हाऊसफुल्ल झाल्या होत्या. शनिवारी दोन्ही बाजूंनी एसटीला प्रचंड गर्दी होती. यामुळे मध्यवर्ती बसस्थानक प्रवाशांच्या गर्दीने गजबजले दिसत आहे. दिवाळी आणि छटपूजेनिमित्त रेल्वेला प्रचंड गर्दी होते. प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने कोल्हापूर-मुंबई, कोल्हापूर कलबुर्गी मार्गावर विशेष रेल्वे सोडली आहे. कोल्हापूर-मुंबई मार्गाबर २४ सप्टेंबर पासून विशेष रेल्वे धावत असून २६ नोव्हेंबर पर्यंत ही सेवा आहे.
या मार्गावर एकूण १० फेऱ्या होणार आहेत. कोल्हापूर-कलबुर्गी मार्गावरही २४ सप्टेंबर पासून विशेष रेल्वे धावत असून ३० नोव्हेंबर पर्यंत ही गाडी धावणार आहे. या मार्गावर ५८ फेऱ्या होणार आहेत. सद्या दिवाळीनिमित्त रेल्वे स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली आहे.








