वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
बीसीसीआयच्या ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’मध्ये (सीओई) साईराज बहुतुलेच्या जागी फिरकी गोलंदाजीचा एक नवीन प्रशिक्षक लवकरच रूजू होणार आहे. बहुतुले या वर्षाच्या सुऊवातीला राजीनामा देऊन आयपीएलमधील संघ राजस्थान रॉयल्समध्ये सामील झालेला आहे.
सीओई, जे बेंगळूर येथील नवीन ठिकाणी स्थलांतरित झाले आहे, ते पूर्वी राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (एनसीए) म्हणून ओळखले जात होते. बहुतुले गेल्यापासून हे पद रिक्त होते आणि आता मंडळाने हे पद भरण्यासाठी अर्ज मागवले आहेत. क्रिकेटच्या सर्व स्वरुपांतील आणि सर्व वयोगटांतील भारतीय फिरकी गुणवत्ता विकसित करण्याची आणि फिरकीपटूंच्या कामगिरीत सुधारणा घडविण्याची जबाबदारी या प्रशिक्षकावर राहील. त्यात भारताचे वरिष्ठ संघ (पुऊष आणि महिला), भारत अ, 23 वर्षांखालील, 19 वर्षांखालील, 16 वर्षांखालील आणि 15 वर्षांखालील संघ तसेच सीओई येथे प्रशिक्षण घेणारे राज्य संघटनांचे खेळाडू यांचा समावेश राहील.
हा फिरकी प्रशिक्षक सीओई येथे क्रिकेट प्रमुख व्ही. व्ही. एस लक्ष्मण यांना बांधिल असेल. फिरकी गोलंदाजीचा प्रशिक्षक हा बीसीसीआयच्या सीओईच्या प्रमुख क्रिकेट संचालकांबरोबर जवळून काम करतो आणि विशेष प्रशिक्षण कार्यक्रम तयार करण्यात तसेच कामगिरीवर देखरेख ठेवण्यात मदत करतो. प्रभावी कामगिरीच्या दृष्टीने आवश्यक प्रशिक्षण योजना विकसित करण्यासाठी निवड समिती, राष्ट्रीय आणि राज्य प्रशिक्षक, कामगिरी विश्लेषक आणि स्ट्रेंथ व कंडिशनिंग तज्ञ यांच्यासमवेत काम करणे देखील या भूमिकेत समाविष्ट आहे, असे बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी म्हटले आहे.
सीओईमध्ये दाखल होणाऱ्या जखमी क्रिकेटपटूंना पूर्णपणे सावरणे आणि सामना खेळण्यास तंदुरुस्त असल्याचे प्रमाणपत्र देणे ही निश्चितपणे नवीन फिरकी प्रशिक्षकावरील प्रमुख जबाबदाऱ्यांपैकी सर्वांत महत्त्वाची असेल. या पदासाठी माजी भारतीय खेळाडू किंवा 75 सामन्यांचा अनुभव असलेला प्रथम श्रेणी क्रिकेटपटू पात्र आहे.









