कामगार संघटनांतून तीव्र नाराजी : विविध मागण्यांसाठी दिले निवेदन
बेळगाव : देशामध्ये कामगार हा घटक सर्वात महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे कामगारदिन 100 वर्षांपूर्वी साजरा करण्याचे ठरविले. मात्र आजतागायत कामगारांविषयी केंद्र किंवा राज्य सरकार असो कधीच गांभीर्याने घेतले नाही. कामगारदिन बेळगावमध्ये तरी जिल्हा प्रशासनातर्फे आतापर्यंत साजरा केला नाही. हा एक प्रकारे कामगारांवर अन्याय आहे. त्यासाठी भविष्यात कामगारांना मोठा लढा उभारावा लागेल. तेव्हा सर्वांनी एकजुटीने हा लढा लढावा, असे आवाहन जिल्हा बांधकाम संघटनेचे अध्यक्ष अॅड. एन. आर. लातूर यांनी केले आहे. कामगार दिनानिमित्त मजगाव येथील कामगार कार्यालयासमोर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमामध्ये त्यांनी कामगारांना मार्गदर्शन केले. बांधकाम कामगार संघटना मजदूर नवनिर्माण संघातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. व्यासपीठावर कामगार साहाय्यक आयुक्त एम. डी. अन्सारी, जिल्हा कामगार अधिकारी तरनंम् बेंगाली, शिवाजी कागणीकर उपस्थित होते. कार्यक्रमानंतर कामगारांतर्फे विविध मागण्यांसाठी निवेदनही दिले. कामगारांना मिळणाऱ्या योजनेची अंमलबजावणी वेळेत केली जात नाही. कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती तसेच शालेय साहित्य देताना वेळेत दिले जात नाही. तेव्हा याबाबत कामगार कार्यालयाने सरकारकडे पाठपुरावा करून वेळेत सर्व योजनांचा लाभ द्यावा, अशी मागणी केली. कार्यक्रमाला कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.









