सैन्याविरोधात वादग्रस्त ट्विटचे प्रकरण
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जेएनयूची माजी विद्यार्थिनी शहला रशीदच्या अडचणी वाढणार आहेत. दिल्लीचे उपराज्यपाल व्ही.के. सक्सेना यांनी शहला विरोधात खटला चालविण्यास मंजुरी दिली आहे. एआयएसएची सदस्य आणि जेएनयू विद्यार्थीसंघाची माजी उपाध्यक्ष शहलाने भारतीय सैन्याला उद्देशून दोन आक्षेपार्ह ट्विट केले होते. विविध समुदायांमध्ये शत्रुत्व वाढविण्यासाठी शहलाने हे ट्विट केल्याचा आरोप आहे. वकील आलोक श्रीवास्तव यांनी याप्रकरणी तिच्या विरोधात तक्रार नोंदविली होती.
काश्मीरची रहिवासी असलेल्या शहला रशीदने 18 ऑगस्ट 2019 रोजी भारतीय सैन्यासंबंधी दोन ट्विट्स केले होते. पहिला ट्विट तिने त्या दिवशी दुपारी 12 वाजता केला होता, त्यात तिने ‘सशस्त्र दल रात्रीच्या वेळी घरांमध्ये घुसते आणि युवकांना उचलून नेते, जाणूनबुजून धान्य जमिनीवर फेकून देते’ असे म्हटले होते. ‘शोपियांमध्ये 4 जणांना सैन्याच्या तळावर बोलाविण्यात आले, चौकशी (छळ) करण्यात आली, एक माइक त्यांच्यानजीक ठेवण्यात आला, जेणेकरून पूर्ण भागात या लोकांचे ओरडणे ऐकू येईल आणि ते दहशतीत राहतील, या कृत्याद्वारे पूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण तयार करण्यात आले’ असे तिने दुसऱया ट्विटमध्ये नमूद केले होते.
भारतीय सैन्याने शहलाने केलेले आरोप फेटाळले होते. अशाप्रकारची बनावट वृत्तं आणि खोटी माहिती शत्रुत्वाच्या भावनेने फैलावली जात असल्याचे सैन्याकडून म्हटले गेले होते. या पार्श्वभूमीवर वकील श्रीवास्तव यांनी शहलाच्या विरोधात तक्रार नोंदविली होती. सैन्याच्या विरोधात खोटे आरोप करणे गंभीर प्रकरण असल्याचे दिल्लीच्या गृह विभागाने मत व्यक्त केले आहे.









