कडोली, अगसगा, केदनूर परिसरातील शेतकऱ्यांना फटका : टोळीच सक्रिय असल्याचा संशय : पोलीस प्रशासन लक्ष देणार का?

बेळगाव : च् ांदन म्हटले की आपल्याला आठवतो तो त्याचा वास. त्यामुळेच चंदनच्या झाडांची किंमत दिवसेंदिवस वाढती आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत याची मागणी मोठी आहे. झाड साधारण 15 ते 20 वर्षांचे झाल्यानंतर त्याची मागणी मोठी असते. मात्र सध्या बेळगाव तालुक्यातील उत्तर भागात चंदन चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. दरम्यान एक टोळीच सक्रिय असल्याचे बोलले जात असून या चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. अन्यथा शेतकऱ्यांनी जगायचे कसे? असा सवाल उपस्थित होत आहे. कडोली, केदनूर, अगसगा परिसरात चंदन चोरट्यांनी हैदोस घातला आहे. परिणामी मागील वर्षीही चंदन चोरीचे प्रकार उघडकीस आले होते. अगसगा येथे दोन वर्षांपूर्वी तर कडोली शिवारात अधूनमधून अशा चोरट्यांनी आपले डोकेवर काढले आहे. सध्या अनेक महागडी रोपटी लावून शेतकरी आपला उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न करतात. मात्र अशा काही घटनांमुळे ते हतबल होत असल्याचे दिसून येत आहे.
कडोली येथील सुरेश शंकर पाटील यांच्या शेतातील चंदनाची दोन वृक्षे तोडण्यात आली आहेत. महत्त्वाचे म्हणजे ही झाडे तोडल्यानंतर आतील केंच (मुख्य भाग) नसल्यामुळे ती झाडे तेथेच सोडून देण्यात आली आहेत. तर काही मोजकाच भाग नेण्यात आला आहे. याचबरोबर आणखी एका झाडाला तोडण्याचा प्रयत्न झाला. मात्र शेतात काही कामानिमित्त शेतकरी गेल्याने चोरट्यांनी तेथून पोबारा केला आहे. दरम्यान सुरेश पाटील यांच्या शेतातील किमान दहा झाडे मागील काही दिवसांपासून तोडण्यात आली आहेत. त्यामुळे या परिसरातील शेतकरी हतबल झाले आहेत. मागीलवेळी त्यांच्याच शेतातील काही पिके नष्ट करण्यात आली होती. त्यावेळीही याची माहिती संबंधित विभागाला देण्यात आली. याचबरोबर केदनूर येथील एका शेतकऱ्याच्या शेतामधील चंदनाचे झाड तोडून नेण्यात आले आहे. मात्र याचे सोयरसुतक कोणालाच नसल्याचे दिसून येत आहे. ही झाडे विक्री करण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे अशा चोरट्यांचा बंदोबस्त करून कडक शिक्षा देण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी होत आहे.
कडोली-केदनूर परिसरात वारंवार घटना
कडोली, केदनूर आणि अगसगा शिवारात असे प्रकार नित्याचेच ठरले आहेत. त्यामुळे येथील शेतकरी वृक्ष लावण्याकडे दुर्लक्ष करत आहेत. हातातोंडाला आलेली झाडे च् ााsरट्यांनी तोडून नेल्याने नाराजीचा सूर उमटत आहे. त्यामुळे नेमकी शेती करायची तरी कोणती? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
चोरट्यांच्या मुसक्या आवळा

झाडे तोडणे व ती चोरून नेणे हे प्रकार नित्याचेच बनले आहेत. मात्र याबाबत प्रशासन कोणतेच पाऊल उचलत नाही. त्यामुळे आता आम्ही जगायचे तरी कसे? दरम्यान हे प्रकार रोखण्यासाठी पोलीस खाते आणि वनखात्याने संयुक्तपणे मोहीम राबवून चोरट्यांच्या मुसक्या आवळाव्यात, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
सुरेश पाटील, शेतकरी









