तपासाला प्रारंभ : पोलीस आयुक्त बोरसे यांची माहिती
प्रतिनिधी/ बेळगाव
संतिबस्तवाड, ता. बेळगाव येथे धर्मग्रंथ जाळल्याप्रकरणी पंधरा दिवसांनंतरही कसलाच सुगावा लागला नाही. त्यामुळे हे प्रकरण पुढील तपासासाठी सीआयडीकडे सोपविण्यात आले आहे. पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी रविवारी पत्रकारांना ही माहिती दिली. आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर दुसऱ्याच दिवशी नूतन पोलीस आयुक्तांनी संतिबस्तवाडला भेट देऊन या घटनेसंबंधी माहिती घेतली होती. बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकातील अधिकाऱ्यांकडूनही घटना जाणून घेतली होती. हे प्रकरण पुढील चौकशीसाठी सीआयडीकडे सोपविण्यात आले असून लवकरच संशयितांना अटक करण्याचा विश्वासही त्यांनी बोलून दाखविला.
सोमवार दि. 12 मे रोजी सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर तणाव निर्माण झाला होता. बेळगाव येथील शेकडो तरुण मोटारसायकलींवरून संतिबस्तवाडला पोहोचले होते. त्याच दिवशी सायंकाळी राणी कित्तूर चन्नम्मा चौक परिसरात निदर्शने करण्यात आली होती. त्यानंतर शुक्रवार दि. 16 मे रोजीही मोठ्या प्रमाणात निदर्शने करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते.
पाच पथके स्थापन करूनही धर्मग्रंथ जाळणारे गुन्हेगार कोण? याचा उलगडा झाला नाही. शेवटी हे प्रकरण सीआयडीकडे सोपविण्यात आले आहे. स्थानिक अधिकाऱ्यांचे सीआयडीला सहकार्य मिळत आहे. लवकरच हे कृत्य करणाऱ्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळू, असा विश्वास भूषण बोरसे यांनी बोलून दाखविला.
धर्मग्रंथ जळीत कांडानंतर संतिबस्तवाड येथे बंदोबस्त वाढविण्यात आला होता. त्या दिवसापासून सातत्याने अधिकारी व पोलीस तैनात करण्यात येत आहेत. हे प्रकरण सीआयडीकडे सोपविल्यानंतर सीआयडीचे अधिकारी बेळगावात दाखल झाले आहेत. पोलीस उपअधीक्षक सुलेमान ताशिलदार यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली असून त्यांनी तपासाला सुरुवात केली आहे. स्थानिक पोलिसांचीही त्यांना मदत मिळत आहे.









