खानापूर तालुका भाजपची पत्रकार परिषदेत मागणी
खानापूर : भाजपचे युवानेते पंडित ओगले यांच्यावर मुख्याधिकारी राजू वठारे यांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याची फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीनुसार पंडित ओगले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या विरोधात खानापूर तालुका भाजप पदाधिकाऱ्यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन निषेध नोंदविला आहे. सदर फिर्याद मुख्याधिकारी राजू वठारे यांनी येत्या दोन दिवसात मागे न घेतल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना माजी आमदार अरविंद पाटील म्हणाले, मुख्याधिकारी राजू वठारे हे गेल्या आठ महिन्यापासून या ठिकाणी कार्यरत आहेत. तेव्हापासून त्यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली आहे. नगरपंचायतीच्या सफाई कर्मचाऱ्यांनी आपले थकीत वेतन देण्यात यावे यासाठी मागणी केल्यावर त्यांना अर्वाच्च शिवीगाळ करून खुर्ची फेकून मारण्यापर्यंत प्रकार घडल्यानंतर सफाई कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गेलेल्या पंडित ओगले यांच्यावर खोटा आरोप करत खानापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. राजू वठारे यांनी स्वत:हून ही फिर्याद मागे घेऊन गुन्हा रद्द करण्यासाठी पोलिसात लेखी निवेदन द्यावे, अन्यथा येत्या दोन दिवसात उग्र आंदोलन छेडू, असा इशारा दिला.
यावेळी आमदार विठ्ठल हलगेकर म्हणाले, सफाई कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनावरून आंदोलन सुरू होते. यानंतर जो प्रकार घडला तो पूर्णपणे राजकीय हेतूने प्रेरित होऊन करण्यात येत आहे. जे हे राजकारण करत आहेत त्यांनी तालुक्मयाच्या विकासासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून राजकारण करावे. तसेच ते आमदार असताना राज्यात भाजपची सत्ता होती. त्यावेळी आम्ही कायम सहकार्याची भूमिका घेतली होती. असे असताना विरोधकांकडून गलिच्छ राजकारण करण्यात येत असल्याने त्याचे पडसाद उमटले आहेत. पंडित ओगले यांच्यावर दाखल केलेला खोटा गुन्हा स्वत: राजू वठारे यांनी तातडीने मागे घ्यावा. संजय कुबल व प्रमोद कोचेरी यांनीही खोटा गुन्हा दाखल केल्याबाबत निश्चितच राजू वठारे यांच्या विरोधात क्रम घेतला जाईल. तसेच वठारे यांच्या वर्तणुकीबद्दल पंचायतराज मंत्री, पालकमंत्र्यांकडे निवेदन देऊन त्यांच्या बदलीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. पत्रकार परिषदेवेळी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.









