पोलार्ड इंग्लंडचा नवा सहायक प्रशिक्षक : ईसीबीकडून घोषणा
वृत्तसंस्था/ लंडन
वेस्ट इंडिजचा माजी अष्टपैलू खेळाडू किरॉन पोलार्ड 2024 च्या टी 20 विश्वचषक स्पर्धेत नव्या भूमिकेत दिसणार आहे. अर्थात पोलार्ड वेस्ट इंडिजकडून नाही तर इंग्लंडच्या संघात दिसणार आहे. इंग्लंडने आगामी टी-20 वर्ल्डकपसाठी किरॉन पोलार्डला सहाय्यक प्रशिक्षक बनवले आहे. पुढील वर्षी टी20 विश्वचषक वेस्ट इंडिज आणि अमेरिकेतच होणार आहे. पोलार्ड कोचिंग स्टाफमध्ये असल्याने इंग्लंडच्या संघाला स्थानिक परिस्थितीचा चांगला फायदा घेता येईल, असे इंग्लिश क्रिकेट मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, फ्रँचायझी लीग क्रिकेटमध्ये सातत्याने दमदार कामगिरी करत त्याने आपला दबदबा निर्माण केला आहे. या जोरावरच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा त्याला प्रतिभा सिद्ध करण्याची संधी मिळाली आहे.
किरॉन पोलार्ड टी 20 स्पेशलिस्ट आहे. त्याला टी20 क्रिकेटचा चांगलाच अनुभव आहे. विशेष म्हणजे, पोलार्ड 2012 मध्ये टी20 विश्वचषक जिंकणाऱ्या वेस्ट इंडिज संघाचा भाग होता. तर 2021 च्या टी 20 विश्वचषकात त्याने वेस्ट इंडिजचे नेतृत्व केले आहे. पोलार्डने विंडीजसाठी एकूण 101 टी 20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. आता त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे पण तरीही तो फ्रँचायझी क्रिकेटमध्ये खेळताना दिसतो. आयपीएलमध्ये त्याने मुंबई इंडियन्सचा फलंदाजी प्रशिक्षक म्हणून चांगले काम केले आहे. आजवरची आंतरराष्ट्रीय आणि लीग क्रिकेटमधील कारकीर्द पाहता इंग्लंड संघाने त्याला सहायक प्रशिक्षक म्हणून त्याची नियुक्ती केली आहे. आगामी टी 20 विश्वचषक हंगामात तो इंग्लंड संघासाठी निर्णायक भूमिका पार पाडताना दिसू शकतो.
इंग्लंडचा फ्लॉप शो
आयसीसी वनडेत अतिशय खराब कामगिरी केल्यानंतर इंग्लंडचा संघ विंडीज दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातही त्यांना टी 20 व वनडेत सपाटून मार खावा लागला आहे. आता, पुढील वर्षी आयसीसी टी 20 वर्ल्डकप स्पर्धा विंडीज व अमेरिकत होणार आहे. या स्पर्धेच्या दृष्टीने ईसीबीने काही महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. विंडीजमधील स्टेडियमची पोलार्डला चांगली ओळख असल्यामुळे तो इग्लिश फलंदाज आणि सोबतच गोलंदाजांना मार्गदर्शन करु शकतो. यातच पोलार्डच्या टी 20 क्रिकेटमधील अनुभवाचा फायदा घेण्यासाठी त्याची नियुक्ती केली गेली असल्याचे ईसीबीकडून स्पष्ट करण्यात आले.









