मच्छे येथील चोरीच्या घटनेने खळबळ : नागरिकांमध्ये भीती
प्रतिनिधी /बेळगाव
एका बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरटय़ांनी ऍन्ड्रॉईड टी. व्ही. व 2 लाख रुपये पळविले आहेत. लक्ष्मी गल्ली-मच्छे येथे ही घटना घडली असून बुधवारी बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
प्रशांत आप्टेकर या कंत्राटदाराच्या घरी चोरीचा प्रकार घडला आहे. चोरटय़ांनी जाता जाता प्रशांत यांची कारही पळविली आहे. कामानिमित्त ते मुंबईला गेले होते. त्यावेळी ही घटना घडली असून मंगळवार दि. 1 नोव्हेंबर रोजी रात्री चोरीची ही घटना उघडकीस आली आहे.
प्रशांत आप्टेकर यांनी बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली आहे. पोलीस उपनिरीक्षक लक्काप्पा जोडट्टी व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. उपलब्ध माहितीनुसार प्रशांत हे व्यवसायाने कंत्राटदार आहेत. त्यांचा वीट व्यवसायही आहे. कामानिमित्त आपल्या घराला कुलूप लाऊन 30 ऑक्टोबर रोजी सकाळी ते मुंबईला गेले होते.
कारची चावी घरातच
मंगळवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास प्रशांत आपल्या घरी परतले त्यावेळी घराच्या आवारात उभी करण्यात आलेली कार दिसली नाही. घरात प्रवेश केले असता चोरटय़ांनी कडीकोयंडा तोडल्याचे उघडकीस आले. कपाटातील 2 लाख रुपये पळविण्यात आले असून एक ऍन्ड्रॉईड टी.व्ही. व एक मॉनिटरही लांबविण्यात आले आहे. कारची चावी घरातच होती. त्या चावीचा वापर करून कार पळविण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.









