वार्ताहर / माणकापूर
माणकापूर येथे सांडपाणी निचरा होण्यासाठी खोदलेल्या गटार ख•dयात कार उलटली. सुदैवाने जीवितहानी टळली असून सदर समस्येवर तात्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
माणकापूर गावातील सांडपाणी जाण्यासाठी ग्राम पंचायतीने चक्क मुख्य रस्त्याच्या मधोमध खोदलेल्या चरीचा अंदाज चालकाला आला नसल्याने कार चरीत उलटली. पण सुदैवाने जीवितहानी टळली. नागरिकांनी कारचालकासह वाहन बाहेर काढले. सदर चरीमुळे एखाद्याचा जीव गेल्यावरच ग्राम पंचायतीला जाग येणार काय, असा संतप्त सवाल ग्रामस्थ व प्रवाशीवर्गातून उपस्थित केला जात आहे. गेल्या सहा महिन्यांपासून ग्राम पंचायत प्रशासनाने जावईशोध लावून चक्क रस्त्याच्या मधोमध चर खोदून गावातील गटारीचे सांडपाणी बाहेर काढून आपले सोपस्कार पूर्ण केले. पण गटार बांधणीसाठी भरघोस निधी उपलब्ध नसल्याने आजतागायत गटारीचे काम रखडले आहे.
याचा नाहक त्रास वाहनधारक व माणकापूरवासीयांना सहन करावा लागतो आहे. गटारीचे बांधकाम सुरू करा म्हणून जनता वैतागली आहे. तरीही कोणी लक्ष द्यायला तयार नाही. त्यामुळे लहान मोठे अपघात घडत आहेत. याची दखल घेत ग्रामपंचायत प्रशासनाने तात्काळ उपाययोजना राबवावी, अशी मागणी होत आहे.









