प्रतिनिधी / बेळगाव
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील विकास केलेल्या रस्त्यावरील चेंबरमध्ये कार अडकल्याची घटना गुरुवारी घडली. यामुळे कारधारकाची चांगलीच तारांबळ उडाली. नागरिकांच्या मदतीने कार बाहेर काढण्यात यश आले. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील मोकळ्या जागेचा विकास करण्यात आला आहे. तर मुख्य रस्त्याचे रुंदीकरण करून सुशोभिकरण करण्यात आले आहे. नव्याने निर्माण केलेल्या रस्त्याच्या विकासामुळे या भागात कार पार्किंगसाठी वाहनधारकांची चढाओढ सुरू आहे. जागा मिळविण्यासाठी प्रत्येकजण पुढे पुढे जात आहेत. रस्त्यावरील पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी चेंबर ठेवण्यात आले आहे. मात्र त्यावर झाकण नसल्याने ते उघडे आहे. कार पार्किंग करण्याच्या घाईत अनावधानाने चेंबरकडे लक्ष न गेल्याने कारचे समोरील चाक चेंबरमध्ये अडकले. त्यामुळे चालकाची तारांबळ उडाली.
कार अडकून पडल्याने बघ्यांची एकच गर्दी झाली. यावेळी अडकलेली कार बाहेर काढण्यासाठी उपस्थित नागरिकांनी मदत केली. अशा घटना वारंवार घडत असल्याने उघड्या चेंबरवर झाकण घालण्याची मागणी वाहनधारकांतून केली जात आहे.









