वनखात्याच्या शोधमोहिमेला अपयश : मुधोळ हाऊंडची गरज : नागरिकांत धास्ती कायम
प्रतिनिधी / बेळगाव
मागील 14 दिवसांपासून सर्व यंत्रणेसह रेसकोर्सच्या मैदानात उतरलेल्या वनखात्याला बिबटय़ाने हुलकावणी दिली आहे. दरम्यान अनेक ठिकाणी बिबटय़ा आढळून येत आहे. त्यामुळे रेसकोर्स परिसरात दहशत माजविलेलाच बिबटय़ा इतर ठिकाणीही दिसत आहे की दुसरा बिबटय़ा आहे? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. 14 दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतरही बिबटय़ा हाती न लागल्याने धास्ती मात्र कायम आहे. शिवाय बेळवट्टीत रविवारी बिबटय़ा निदर्शनास आल्याने नेमकी कोणत्या ठिकाणी शोधमोहीम हाती घ्यावी? असा प्रश्नदेखील वनखात्यासमोर आहे.
जाधवनगर परिसरात 5 ऑगस्ट रोजी एका गवंडय़ावर हल्ला करून बिबटय़ाने रेसकोर्स परिसरात आसरा घेतला होता. दरम्यान, वनखात्याने बिबटय़ाच्या शोधासाठी संपूर्ण यंत्रणा कामाला जुंपली होती.
मात्र अद्याप या शोधमोहिमेला यश आले नाही. दरम्यान बिबटय़ा सातत्याने निदर्शनास येत असल्याचे नागरिकांकडून कळते. 14 टॅप कॅमेरे, 6 पिंजरे, 3 ड्रोन कॅमेरे आणि 70 कर्मचाऱयांच्या माध्यमातून रेसकोर्स परिसरातील 30 एकर क्षेत्र पिंजून काढले आहे. शिवाय परिसरातील झाडांना टॅप कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मात्र या कॅमेऱयांमध्ये बिबटय़ाच्या काहीच हालचाली कैद झाल्या नाहीत. त्यामुळे रेसकोर्स परिसरातून बिबटय़ा निसटला असावा, असा अंदाजही व्यक्त होत आहे.
मानवी वस्तीतील वन्यप्राण्यांचा वाढता वावर
मागील आठवडाभरात येडूरवाडी, बेळगाव, मुडलगी या ठिकाणी बिबटय़ा, भुतरामहट्टीत हरिण तर मोदगा येथे तरस आढळून आले आहे. शिवाय खानापूर तालुक्मयात चक्क रस्त्यावर हत्ती निदर्शनास आला. त्यापाठोपाठ रविवारी बेळवट्टीमध्ये एका शेतकऱयाला बिबटय़ा दिसला आहे. त्यामुळे अलीकडे मानवी वस्तीत वन्यप्राण्यांचा वावर वाढत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे मानवी वस्तीतील वन्यप्राण्यांचा वाढता वावर रोखण्याचे नवे आव्हान वनखात्यासमोर आहे.
अद्याप कोणताच पुरावा हाती नाही
रेसकोर्सच्या मैदानात सर्व यंत्रणेसह वनखाते तळ ठोकून असले तरी बिबटय़ाच्या पाऊलखुणा, वि÷ा किंवा इतर कोणताच पुरावा हाती लागला नाही. मात्र दुसरीकडे बिबटय़ा अनेक ठिकाणी निदर्शनास आल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे बिबटय़ा बेळगाव शहर आणि तालुक्मयातच वावरत असल्याचे पुढे येत आहे. त्यामुळे वनखात्याची जबाबदारी वाढली असून बिबटय़ा ज्या ठिकाणी निदर्शनास येत आहे, त्या ठिकाणी शोधमोहीम हाती घेणे आवश्यक आहे.
हनुमाननगर डबल रोडवर एका कुटुंबीयाला बिबटय़ा संरक्षण भिंतीवरून उडी मारताना निदर्शनास आला. त्यानंतर बेळवट्टीत बिबटय़ा आढळून आला. त्याबरोबर अरगन तलावानजीक काही वाहनधारकांना बिबटय़ाचे दर्शन झाले आहे. त्यामुळे हा एकच बिबटय़ा सगळीकडे फिरत आहे की, दुसरा बिबटय़ा आहे. याबाबतही संभ्रम आहे.
रेसकोर्सच्या मैदानात मुधोळ श्वान उतरवणार का?
बिबटय़ाच्या शोधासाठी मुधोळ हाऊंड श्वानांचा वापर करावा, अशा सूचना पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी केल्या आहेत. मुधोळ हाऊंड हा शिकारी जातीचा कुत्रा दोन ते तीन किलोमीटर अंतरापर्यंत शोध घेऊ शकतो. त्यामुळे वनखाते आता बिबटय़ाच्या शोधासाठी मुधोळ श्वानांचा वापर करणार का? याकडे लक्ष लागले आहे. आक्रमक वृत्तीच्या या श्वानांची यापूर्वी पोलीस दलाकडून मदत घेतली जात होती. आता बिबटय़ाच्या शोधासाठी रेसकोर्सच्या मैदानात मुधोळ कुत्रा उतरणार का? हेच पहावे लागणार आहे.
मुधोळ श्वानाबाबत विचारविनिमय सुरू
बिबटय़ासाठी सर्व यंत्रणेनिशी शोधमोहीम सुरू आहे. मुधोळ श्वानाचा आता शोधासाठी वापर केला जाणार आहे. यासाठी विचारविनिमय सुरू आहे. बिबटय़ा हाती न लागल्यास मुधोळ श्वानाची मदत घेतली जाणार आहे. बिबटय़ाबाबत काही निदर्शनास आल्यास वनखात्याशी संपर्क साधावा. मल्लिनाथ कुसनाळ (एसीएफ वनखाते)