गोवा इंटेलिजेंट सिटी मॅनेजमेंट सिस्टीमचे उद्घाटन : नियम मोडणाऱ्यांवर, गुन्हेगारांवरही ठेवणार नजर
पणजी : वाढणाऱ्या विविध गुह्यांच्या घटना, अनुचित प्रकार रोखणे तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करून कायदा आणि सुव्यवस्था बिघडविणाऱ्यांवर जरब बसविण्यासाठी आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची करडी नजर राहणार आहे. राजधानी पणजीत तब्बल 382 सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत करण्यात आले आहेत. वाहतूक नियम मोडणे, इतर गुन्हे किंवा अनुचित प्रकार रोखण्यासाठी सरकारतर्फे गोवा इंटेलिजेंट सिटी मॅनेजमेंट सिस्टीमचे काल शुक्रवारी आल्तिनो पणजी येथील माहिती आणि तंत्रज्ञान खात्यात उद्घाटन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला माहिती व तंत्रज्ञानमंत्री रोहन खंवटे, केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, माहिती तंत्रज्ञान महामंडळाचे अध्यक्ष डॉ. चंद्रकांत शेट्यो, पोलिस महासंचालक जसपाल सिंग, जिल्हाधिकारी मामू हागे, महापौर रोहित मोन्सेरात उपस्थित होते.
सर्व माहिती मिळेल एकत्र
वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर, बेदरकार गाडी चालविणाऱ्यांविऊद्ध कडक कारवाई करण्यात येणार असून, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना आठ दिवसांच्या आतच घरी दंडाचे चलन येणार आहे. पणजी शहरात ध्वनी व वायू प्रदूषण, तापमान, आद्रतेची माहिती आता या यंत्रणेमुळे एकत्रित मिळणार आहे.
राज्याच्या संरक्षणासाठी उपयुक्त
मंत्री रोहन खंवटे म्हणाले, गोवा इंटेलिजेंट सिटी मॅनेजमेंट सिस्टम ही राज्याच्या संरक्षणासाठी उपयुक्त ठरणार आहे. या यंत्रणेमुळे गुन्हे तसेच वाहतूक नियम मोडण्याच्या प्रकारावर निश्चितच रोख बसेल. ही यंत्रणा पोलीस खाते, वाहतूक खाते, आपत्कालीन व्यवस्थापन, महापालिकेच्या घन कचरा व्यवस्थापनात सुविधा पुरविण्याचेही काम बजावणार आहे. वाढणारे गुन्हे हे चिंतेची बाब असली तरी अशा स्वऊपाच्या घटना घडू नयेत, यासाठी प्रत्येकाने सजग राहून पोलिसांना माहिती देणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले. या कार्यक्रमात जिल्हाधिकारी मामू हागे, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, पोलीस महासंचालक जसपाल सिंग यांनीही मार्गदर्शन केले.
चेहराही ओळखता येणार
गोवा इंटेलिजेंट सिटी मॅनेजमेंट सिस्टीममध्ये 382 फिक्स बॉक्स सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आहेत. 44 ठिकाणी पीटीसी म्हणजे चारी बाजूने फिरणारे कॅमेरे आहेत. 10 कॅमेरे हे चेहरा ओळखण्यासाठी आहेत. याशिवाय 10 वायू व ध्वनी मापक पर्यावरणीय सेन्सर आहेत. एकूण 87 सार्वजनिक व्हायफाय यंत्रे आहेत.
दुचाकी चालकामागे बसणाऱ्याने हेल्मेट वापरावे : बोसुएट डिसील्वा
दुचाकी चालवणाऱ्या व्यक्तीच्या पाठिमागे बसणाऱ्यानेही हेल्मेट परिधान करणे बंधनकारक आहे. तरीही काहीजण हेल्मेट वापरत नाहीत आणि त्यामुळे गेल्या 20 दिवसांमध्ये सातजणांना अपघातात जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे आता गोवा वाहतूक पोलिसांनी दुचाकी चालक व मागे बसणाऱ्यालाही हेल्मेट वापरण्यासाठी सक्ती करण्यात येणार आहे, अशी माहिती वाहतूक पोलीस खात्याचे अधीक्षक बोसुएट सिल्वा यांनी दिली. विना हेल्मेट दुचाकी चालविल्यास नवीन वाहन कायद्यानुसार 1 हजार ऊपये दंड ठोठावण्यात येतो. तसेच तीन महिन्यांसाठी वाहन परवानाही निलंबित करण्याची तरतूद आहे. त्यामुळे आता दुचाकीस्वाराच्या पाठिमागे बसणाऱ्या व्यक्तीनेही हेल्मेट घातले नसेल तर त्याच्याविऊद्धही कडक कारवाई केली जाणार असल्याचे अधीक्षक सिल्वा यांनी सांगितले.









