72.50 टक्के मतदान, आज मतमोजणी
पणजी : तिसवाडी तालुक्यातील सांत इस्तेव्ह, पेडणे तालुक्यातील पार्से आणि सासष्टी तालुक्यातील धर्मापूर या तीन ग्राम पंचायतींच्या प्रत्येकी एका प्रभागासाठी काल रविवारी झालेली पोटनिवडणूक शांततेत पार पडली. तिन्ही ठिकाणी मिळून 72.50 टक्के मतदान नोंद झाले. आज दि. 3 रोजी मतमोजणी होणार आहे. पार्से पंचायतीच्या प्रभाग क्रमांक 7, सांत इस्तेव्ह पंचायतीच्या प्रभाग क्रमांक 5 आणि धर्मापूर पंचायतीच्या प्रभाग क्रमांक 2 साठी ही पोटनिवडणूक झाली. त्यातील पार्से पंचायतीसाठी सर्वाधिक 85.16 टक्के मतदान झाले. या प्रभागातील 593 पैकी 505 मतदारांनी त्यात सहभाग घेतला. सांत इस्तेव्ह पंचायतीत 71.31 टक्के मतदान झाले. त्यात 502 पैकी 358 मतदारांनी भाग घेतला. धर्मापूर ग्रामपंचायतीत 60.91 टक्के मतदान झाले. तेथील 596 पैकी 363 मतदारांनी भाग घेतला. दरम्यान, आज दि. 3 रोजी तिन्ही पंचायत प्रभागांची मतमोजणी होणार असून संबंधित तालुक्यांच्या मामलेदार कचेरीत सकाळी प्रारंभ होणार आहे. निवडणूक आणि मतमोजणीच्या अनुषंगाने लागू करण्यात आलेले 144 कलम मतमोजणी संपेपर्यंत चालू राहणार आहे.









