महाराष्ट्र, कर्नाटकसह देशाच्या विविध भागांत परतीच्या पावसाचा धडाका सुरूच असून, मागच्या दोन आठवडय़ांत तब्बल 16 राज्यांमध्ये अतिवृष्टी झाल्याची नोंद आहे. या पावसाने शहरातील जनजीवनाला दणका देण्याबरोबरच पीकपाण्यासह ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही जबर तडाखे दिल्याचे दिसत आहे. त्यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावरच ‘दिवाळे’ निघाल्याचे चित्र ठिकठिकाणी पहायला मिळते. साधारण सप्टेंबरच्या तिसऱया आठवडय़ात परतीच्या मान्सूनला सुरुवात होत असते. 15 ऑक्टोबरपर्यंत नैर्त्रुत्य मोसमी पाऊस देशातून माघारी फिरत असतो. पुढच्या किती दिवसात परतीचा पाऊस देशाला अलविदा करणार, हे लवकरच कळेल. किंबहुना मागच्या दहा ते पंधरा दिवसांतील त्याचा ओघ पाहता ‘जा रे जा रे पावसा’ असेच म्हणण्याची वेळ येऊन ठेपली आहे. जून ते सप्टेंबर या हंगामाचा विचार करता पहिला महिना वगळता उर्वरित तीनही महिने पाऊसपाण्याच्या दृष्टीने पाणीदार गेले, यात शंका नाही. हवामान विभागाकडून जून ते सप्टेंबर या कालावधीत भारतभरात 103 टक्क्यांपर्यंत पाऊस होईल, असा सुधारित अंदाज देण्यात आला होता. प्रत्यक्षात सहा टक्के अधिकचा पाऊस झाल्याचे दिसत आहे. या पावसाने महाराष्ट्र, कर्नाटक व शेजारील राज्यांसह अनेक राज्यांमध्ये सुगीचे दिवस येण्याच्या आशा निर्माण झाल्या होत्या. तथापि, परतीच्या पावसाने यावर पाणी फेरल्याचे दिसून येते. परतीच्या पावसाचा म्हणून एक धडाका असतो, हे मान्य. परंतु, मागच्या आठवडाभरात विविध भागांत पडलेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे हवामान बदलाच्या शक्यतांना पुष्टीच मिळते. महाराष्ट्र व कर्नाटकसह जवळपास सहा राज्यांमध्ये मागच्या दोन आठवडय़ांमध्ये अतिरिक्त पाऊस झाला आहे. महाराष्ट्रात सरासरीच्या 59 टक्के, तर कर्नाटकात सरासरीच्या 45 टक्के अधिक पाऊस नोंदविण्यात आला असून, यूपी, दिल्लीसारख्या ठिकाणी हे प्रमाण 600 टक्क्यांपेक्षा अधिक दिसते. अद्यापही हा ओघ सुरूच असल्याने शेतपिके अक्षरशः मातीमोल झालेली दिसतात. महाराष्ट्रातील स्थिती तर भयावहच ठरावी. वास्तविक कृषी क्षेत्रात खरीप हंगाम हा प्रमुख मानला जातो. राज्यात एकूण 1 कोटी 47 लाख इतके खरीपाचे क्षेत्र आहे. त्यात 29 लाख हेक्टरहून अधिक क्षेत्राला पावसाचा फटका बसला आहे. या अस्मानी संकटात कपाशी, सोयाबीन, भात, मका, तूर, बाजरी, ज्वारीसह भाजीपाला, फळभाज्या, फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. मराठवाडा हा दुष्काळवाडा म्हणूनही ओळखला जातो. परंतु, आता कोरडय़ा दुष्काळाऐवजी ओल्या दुष्काळाचे सावट या भागावर ओढवले की काय, असा प्रश्न पडतो. औरंगाबाद, बीड, जालना, लातूर, उस्मानाबाद, हिंगोली या जिल्हय़ांमधील परिस्थिती पाहिली, तर कुणाच्या डोळय़ात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. सोयाबीनला सर्वाधिक फटका बसला असून, शेंगांवरील बुरशीची वाढ, दाण्यांवरील डाग, फुटलेले मोड यातून अडचणींची कल्पना यावी. कपाशीही बाधित झाल्याने त्याचा नक्कीच प्रतवारीवर परिणाम होऊ शकेल. तर तूर, हळद, फळे, भाजीपाला व अन्य पिकांच्या वाताहतीने एकूणच रोजची तोंडमिळवणी करणे अवघड बनेल. तिकडे उत्तर महाराष्ट्रात द्राक्ष, मका, बाजरी, कांदा, टोमॅटोवर गंडांतर आले. विदर्भ, खान्देशात कपाशी, ज्वारी, सोयाबीनला, तर कोकणात भीतपिकालाही झळ बसली. सधन मानल्या जाणाऱया पश्चिम महाराष्ट्रातदेखील उसासह ज्वारी, बाजरी, मका, सोयाबीन, द्राक्ष, सीताफळ, लिंबू आदींसह भाजीपाला, फळभाज्या मातीमोल झाल्या. हे चित्र भीषण आहे. खरे तर शेती हा अत्यंत जोखमीचा व्यवसाय होय. लहरी निसर्गाशी बळीराजाला सातत्याने लढावे लागते. कधी पाऊस, तर कधी अतिवृष्टीने पिके हाताबाहेर जातात. नैसर्गिक आपत्तींतून पीक वाचलेच, तर पुढे शेतमालाच्या भावासाठी शेतकऱयांना संघर्ष करावा लागतो. त्यातून अनेकदा उत्पादन खर्चही निघत नाही. वर्षानुवर्षे हे दुष्टचक्र सुरू असून, यंदा पावसाचा घणाघात पाहता शेतकऱयांकरिता हे वर्ष अधिक कसोटीचे राहणार, हे निश्चित. म्हणूनच शेतकऱयांना हात कसा देता येईल, यावर सरकारचा कटाक्ष हवा. महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्या रुपाने एक कार्यक्षम मुख्यमंत्री राज्याला मिळाला आहे. शेतकऱयांना तातडीची मदत कशी देता येईल, हे शिंदे सरकारने पाहिले पाहिजे. खरीप हंगामातून मिळालेल्या उत्पन्नातून शेतकरी आपली दिवाळी साजरी करीत असतात. परंतु, परतीच्या पावसातून शेतीचे दिवाळे निघाल्याने सण साजरा कसा करायचा, हा शेतकऱयांपुढचा प्रश्न असेल. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सक्षम सरकार असून यांचा राज्यातील सरकारवर वरदहस्त आहे. हे पाहता अधिकची मदत राज्याला मिळू शकते. राज्यातील जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम विरोधी पक्षांचे आहे. त्यामुळे विरोधकांनी हा प्रश्न लावून धरायला हवा. जेणेकरून शेतकऱयांना लवकर मदत मिळू शकेल. याशिवाय यंदा ढगफुटी वा त्यासदृश पाऊस वेगवेगळय़ा भागात अनुभवायला मिळाला. हवामान बदल, जागतिक तापमानवाढीची चर्चा होत असतानाच असा पाऊस होणे, ऑक्टोबर हीट गायब होणे, परतीच्या पावसाची तीव्रता वाढणे व पर्यायाने पाऊस लांबणे, या बदलत्या चक्रावर अधिक अभ्यास व्हायला हवा.
Previous Articleपेरणी .. ‘जिजीविषेची’
Next Article मँचेस्टर युनायटेडचा निसटता विजय
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








